पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin : भारतीय क्रिकेट संघाचा ३३ वर्षीय अनुभवी कसोटी स्पेशल फलंदाज चेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघासाठी डावाची सलामी देण्याची संधी मिळाली. खरे तर संघाचा नियमित सलामीवीर शुभमन गिल दुसऱ्या डावात हाताचा कोपरा दुखावल्याने फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाही. अशा स्थितीत अग्रवालसह पुजाराला डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. यादरम्यान तो यशस्वीही झाला. मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत पुजारा ५१ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. पण दुस-या दिवशी त्याल ४७ धावांवर असताना एजाज पटेलने बाद करत तंबूचा रस्ता दाखवला.
सामन्यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि एक षटकारही आला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या ३३ वर्षीय किवी फिरकीपटू एजाज पटेलच्या एका चेंडूवर पुजाराने शानदार षटकार ठोकला. याच एजाजने पहिल्या डावात भारतीय संघाच्या १० विकेट घेत इतिहास रचला. वास्तविक एजाजने शॉर्ट पिच बॉल टाकून पुजाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण भारताचा अनुभवी फलंदाज त्यासाठी तयार होता. पुजाराला चेंडू काही अंतरावर आदळताना दिसताच तो लगेच मागे आला आणि त्याने मिड-विकेटवर शानदार षटकार ठोकला.
पुजाराच्या या षटकारानंतर त्याचे चाहते चांगलेच खूश झाले. त्याच्या बॅटने तब्बल दोन वर्षानंतर चेंडू सीमापार गेल्याने सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली. पुजाराने शेवट षटकार २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ठोकला होता. काल (दि. ४) वानखेडे मैदानावर भारताच्या दुस-या डावात पुजारा सलामीला आला. मयंक अग्रवालसह त्याने संयमी फलंदाजी केली. या खेळी दरम्यान त्याने एजाज पटेला एक उत्तुंग षटकार लगावला. या षटाकारा बरोबरच पुजाराने अश्विनच्या (R Ashwin) एका प्रश्नालाही उत्तर दिले. खरे तर वर्षाच्या सुरुवातीलाच अश्विनने इंग्लंड मालिकेपूर्वी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्याशी काही खास चर्चा केली होती. यादरम्यान त्याने पुजाराला फिरकी गोलंदाजाविरुद्ध षटकार ठोकण्याचे आव्हान दिले होते.
त्यादरम्यान, राठोड यांच्याशी संवाद साधताना अश्विनने (R Ashwin) पुजाराकडून आव्हान पूर्ण केले गेल्यास अर्धी मिशी कापून मैदानात खेळायला जाईन, असे सांगितले होते.
दुसरीकडे या आव्हानाबद्दल बोलताना राठोड म्हणाले की, 'मी पुजाराला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा तरी हवेत मोठा शॉट खेळ. षटकार चेंडू सीमापार पोहचव. पण तो (पुजारा) माझं म्हणणं ऐकाला तयार नाही. असं का करू शकत याबद्दल तो अनेक अडचणी कथन करत आहे.'
राठोड यांच्या त्या वक्तव्यानंतर अश्विनने (R Ashwin) पुजाराला उघड-उघड आव्हान दिले. अश्विन म्हणाला, 'पुजाराने कोणत्याही फिरकीपटूला षटकार मारला तर मी अर्ध्या मिशा कापून मैदानात उतरेन.'
आता मुंबई कसोटी सामन्यात न्यूझीलंड दुस-या डावासाठी फलंदाजीस उतरेल तेव्हा अश्विन त्याची अर्धी मिशी कापून मैदानात उतरणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.