रायगडावरील राज दरबारातील मानवंदना पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील: भरत शेठ गोगावले | पुढारी

रायगडावरील राज दरबारातील मानवंदना पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील: भरत शेठ गोगावले

इलियास ढोकले

नाते:
किल्ले रायगडावरील राज दरबारात दहा वर्षांपूर्वी सुरू असलेली पोलीस दलाची मानवंदना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर ती लवकर सुरू होण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी आज (दि.२३) किल्ले रायगडावर दिली.

प्रतिवर्षाप्रमाणे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे, स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४४ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त किल्ले रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित शिवभक्तांसमोर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, हिंदू जनमानसाला जोडणारा दुवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशात ओळखले जातात. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हभप पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर यांनी छत्रपतींना देवत्व प्राप्त झाले होते, अशा शब्दांत छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला.

याप्रसंगी सरसेनापती प्रतापराव गुजर व हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याचे वंशज तसेच एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर, मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम आदी उपस्थित होते.
किल्ले रायगडावर शिवसृष्टी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण केलेली मागणी मंजूर झाली आहे. यासाठी ५० कोटींच्या निधीला आता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याची माहिती गोगावले यांनी यावेळी दिली.

मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी राज्याभिषेक सोहळ्यानंतर प्रतिवर्षी मंडळाकडून केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन आगामी काळात राज्यात विविध प्रकारचे कार्यक्रम मंडळामार्फत वेगळ्या यंत्रणांमधून सुरू राहणार असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा श्री शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार जेष्ठ मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तो पुणे येथील त्यांच्या मुक्कामी त्यांना समर्पित करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी हंबीरराव मोहिते यांच्या वंशजानी लिहिलेल्या “शास्त्रतेज” व मंडळाच्या प्रतिवर्षी प्रकाशित होणाऱ्या” शिवरायमुद्रा” स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जानेवारी महिन्यात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले. शिव पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड, पाचाड व परिसरामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा 

Back to top button