रायगडमध्ये कॉंग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश | पुढारी

रायगडमध्ये कॉंग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोक आपल्यासोबत येत आहेत, याचा अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी   घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारापासून अजिबात ढळलेला नाही, हे सिद्ध होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व  माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा आज (दि.२२)  मुंबईत एमसीए लॉन्ज येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अंतुले यांच्यासोबत अॅड. विलास नाईक यांनीही जाहीर प्रवेश केला.

 तटकरे म्हणाले की, बॅ. ए. आर अंतुले यांच्यामुळे राज्यमंत्री  पद महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्माण झाले. देशातील पहिली कर्जमाफी अंतुले यांनी ७ कोटी रुपयांची केली होती. शिवाय आमदारांना कायमची निवासस्थाने दिली. आमदारांचा प्रोटोकॉलही आणि आमदारांचे स्थान बळकट करण्याचे काम बॅरिस्टर अंतुले यांनी त्यावेळी केले होते.  माझ्या वडिलांसोबत अंतुलेसाहेबांकडे जायचो त्यावेळेपासून मुश्ताक अंतुले माझे स्नेही झाले. दीर्घकाळ आमची मैत्री राहिली आहे. बॅरिस्टर अंतुले यांनी कॉंग्रेसला मोठे स्थान मिळवून दिले. इंदिरा गांधींना सहकार्य केले. त्यातून त्यांनी देशात दबदबा निर्माण केला होता. मात्र कॉंग्रेसने त्यांना पुढे जाऊन का मानाचे स्थान दिले नाही माहित नाही. कॉंग्रेसने ठरवले असते, तर मुश्ताक अंतुले यांचा उपयोग कॉंग्रेस वाढीसाठी झाला असता असेही तटकरे म्हणाले.

मुश्ताक अंतुले म्हणाले की, महाराष्ट्रात विकास करण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. म्हणून मी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.  अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये काम केल्यानंतर आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर हा क्षण येणार होता. तो आज २२  आला आहे.  श्रीवर्धनमध्ये सुनिल तटकरे, अदिती तटकरे काम करत होते. अंतुलेसाहेबांनी ज्या योजना आखल्या होत्या. त्या सगळ्या योजना तटकरे पूर्ण करत होते.  बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर जी धमक कुणात असेल तर ती तटकरे यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच मी प्रभावित झालो आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, वाय बी त्रिवेदी, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, बाबा सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button