परभणी: पांगरा परिसरात चक्रीवादळासह अवकाळीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली | पुढारी

परभणी: पांगरा परिसरात चक्रीवादळासह अवकाळीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा तरंगल, वाई लासीना, गोविंदपूर, लोण बू, हिवरा, रेगाव, धोतरा, मरसूळ, पिंपळा शेतशिवारात सोमवारी सायंकाळी चक्रीवादळासह अवकाळी पाऊस पडला. यात शेतातील अखाड्याच्या गोठ्यावरील टिनपत्रे उडून गेली. मोठी झाडे उन्मळून पडली. आंबा फळाची मोठ्या प्रमाणावर पडझड होवून नुकसान झाले.

चक्रीवादळासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हाहाकार उडाला. शेतकरी आडोशा शोधण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. धोतरा येथे माधव खंडागळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने खोड जळून काळे झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गेल्या दहा बारा दिवसांपासून अवकाळी शेतक-यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे हळद, आंबा, भाजीपाला यासह पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेती अखाडे उद्ध्वस्त होत आहेत. झाडे उन्मळून रस्त्यात पडलेल्याने वाहतूक बंद होत आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने नुकसानीच्या पाहणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी वा-यावर सोडले जात आहे.

दरम्यान, २७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधीत पिकांचे अनुदान मिळालेले नाही. तहसिल कार्यालयातील डिसबसमेंट पंचनामा शासकीय पोर्टल सतरा दिवसांपासून बंद केले आहे. त्यामुळे अनुदान वाटप प्रक्रिया ठप्प झाली आहे. आता पुन्हा चक्रीवादळ, अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही सबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी केवळ बघ्याच्या भुमिकेत असून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा 

Back to top button