काँग्रेसचा डोळा मंगळसूत्रांवर; नरेंद्र मोदी यांचा घणाघात | पुढारी

काँग्रेसचा डोळा मंगळसूत्रांवर; नरेंद्र मोदी यांचा घणाघात

अलिगढ ः वृत्तसंस्था : काँग्रेससह इंडिया आघाडीचा डोळा देशवासीयांच्या बचतीसह संपत्तीवर आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांचे मंगळसूत्रही सुरक्षित राहणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, विरोधकांच्या जाहीरनाम्यात देशवासीयांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. देशातील लोकांनी कष्टाने कमवलेल्या बचती आणि संपत्तीवर इंडिया आघाडीचा डोळा आहे. देशवासीयांची मालमत्ता ताब्यात घेऊन आपापसात वाटण्याचा डाव काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा आहे. प्रत्येकाच्या घरातील दागिन्यांची माहिती घेणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. माता-भगिनींकडे असणारे सोने घेऊन वितरित करण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे.

माता-भगिनींच्या स्त्रीधनाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कायद्याद्वारेही सोन्याला सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. काँग्रेसचा शहजादा मात्र आया-बहिणींचे दागिने हिरावून घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांचे मंगळसूत्रही सुरक्षित राहणार नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही देशातील संसाधनावर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला हक्क असल्याचे सांगितल्याच्या घटनेलाही मोदी यांनी यावेळी उजाळा दिला.

मोदी पुढे म्हणाले, मुस्लिम धर्मातील तिहेरी तलाकसारखी अनिष्ट प्रथा आम्ही बंद केली. हज यात्रेकरूंसाठी वाढीव कोटा दिला आहे. आपल्याकडे गावाकडे वडिलार्जित घर असल्यास आणि मुलांच्या भवितव्यासाठी शहरात सदनिका घेतली असल्यास विरोधक दोन्ही घरापैकी एक घर काढून घेणार आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी ही माओवादी असल्याची टीकाही त्यांनी केली.

मोदींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साक्षर करण्याची गरज असल्याचा टोला लगावला. मोदी यांनी काँग्रेसविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने निवडणूक आयोगाकडे मोदी यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लोकप्रियता मिळत असल्यामुळे मोदी सैरभैर झाले असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे. निवडणूक आयोगाने मात्र मोदी यांच्या वक्तव्यावर मौन बाळगले आहे.

Back to top button