कोल्हापूर : माघारीचा आज शेवटचा दिवस | पुढारी

कोल्हापूर : माघारीचा आज शेवटचा दिवस

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 22) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असून यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोल्हापुरातून 27 तर हातकणंगलेतून 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी डमी भरलेले अर्ज माघार घेतले जातील. मात्र अपक्ष काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार राहिले तर दोन बॅलेट युनिट (बीयू) जोडावे लागणार आहेत. तसे झाले तर प्रशासनाची धावपळ होणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी 28 उमेदवारांनी एकूण 42 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांच्या छाननीत दोन उमेदवारांचे तीन अर्ज अवैध ठरले. एका उमेदवाराचा एकच अर्ज होता. तो अवैध ठरल्याने कोल्हापूर मतदारसंघातून 27 उमेदवार सध्या रिंगणात आहेत. हातकणंगले मतदारसंघासाठी 36 उमेदवारांनी एकूण 55 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यामुळे हातकणंगले मतदारसंघातून 32 उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत.

सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दुपारी तीनपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात माघारीसाठी आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र दुपारी तीननंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याकरिता प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

माघारीनंतर चिन्ह वाटप

अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर इतर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह देण्यात येईल. अपक्ष उमेदवारांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आयोगाच्या नियमांनुसार मुक्त चिन्हापैकी एक चिन्ह दिले जाणार आहे.

प्रशासनाचे माघारीकडे लक्ष

कोल्हापूर मतदारसंघातून 27 तर हातकणंगले मतदारसंघातून 32 उमेदवार रिंगणात असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 15 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले तर त्या मतदारसंघात दोन बॅलेट युनिट (बीयू) जोडावे लागणार आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली तर जिल्हा प्रशासनाकडे सध्या एकाच मतदारसंघात दुसरे बॅलेट युनिट जोडता येतील इतक्या संख्येने बॅलेट युनिट आहेत. दोन्ही मतदार संघात ही परिस्थिती निर्माण झाली तर अन्य जिल्ह्यातून बॅलेट युनिट मागवावी लागणार आहेत. यामुळे कोल्हापूर मतदारसंघातून किमान 12 तर हातकणंगले मतदारसंघातून 17 उमेदवारांनी माघार घेण्याची गरज आहे.

Back to top button