राज्यातील अकरा मतदारसंघांतील लढती आज स्पष्ट होणार | पुढारी

राज्यातील अकरा मतदारसंघांतील लढती आज स्पष्ट होणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसर्‍या टप्प्यातील 11 मतदारसंघांतील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. कोल्हापूरसह हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, माढा, सोलापूर, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), बारामती आणि रायगड या 11 मतदारसंघांतील बहुतांश लढती स्पष्ट झाल्या असल्या तरी त्यावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील दिग्गजांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे.

राज्यातील तिसर्‍या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया 12 एप्रिलपासून सुरू झाली. या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. अकरा मतदारसंघांपैकी लातूर आणि सोलापूर हे दोन मतदारसंघ अनूसूचित जातीसाठी राखीव आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे खा. विनायक राऊत अशी थेट लढत आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटील, लातूरला भाजपचे सुधाकर शृंगारे विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळगे, सोलापूरला काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात महायुतीचे राम सातपुते, माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोधात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते, बारामतीत खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय लढत, सांगलीमध्ये सध्या तरी ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपचे खा. संजय पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी लढत दिसते. कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू महाराज यांच्या विरोधात शिवसेनेचे (महायुती) प्रा. संजय मंडलिक अशी लढत होत आहे; तर हातकणंगलेत शिवसेनेचे खा. धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील-सरुडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह वंचितचे डी. सी. पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. रायगडमध्ये अजित पवार गटाचे खा. सुनील तटकरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनंत गीते अशी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीनेही यातील बहुतांश मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांकडेही लक्ष लागले आहे.

Back to top button