शोध सुखाचा : पैसा… पैसा | पुढारी

शोध सुखाचा : पैसा... पैसा

सुजाता पेंडसे

मनात इच्छा आहेत; पण त्या पूर्ण होण्याच्या मार्गात कोणते अडथळे येतात, ते काढून टाकण्याबरोबरच आणखी एक गोष्ट घडणेही अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे दोघांचे एकमत. हे दोघे म्हणजे जागृत मन आणि सुप्त मन. या दोघांचे एकमत झाले, तर जगात अवघड असे काही नाही. तुमची कल्पना आणि तुमचे विचार यांचे एकमत झाले, तर कुठलीही प्रार्थना यशस्वी होते, कोणतीही चांगली इच्छा पूर्ण होते; परंतु इच्छेच्या आड बुद्धी येत असते. ती क शी ते पाहूया…

एका तरुणीपुढे प्रॉपर्टीसंबंधी काही समस्या उद्भवल्या होत्या. कायद्यानुसार गेले तर तिच्या प्रॉपर्टीची समस्या सुटण्यास कितीही वर्षे लागली असती; पण दुसरी पार्टी आणि ती यांच्यात तडजोड झाली तर प्रश्न कोर्टाबाहेर सुटण्यास मदत झाली असती आणि वेळ-पैसा वाचला असता. ती देवाला प्रार्थना करत होती की, ‘माझी लवकर या सगळ्यातून सुटका होऊ दे;’ पण तिचेच मन मग विचार करायचे की, ‘कसं होणार सगळं? किती अडचणी आहेत यात. ते लोक भरपूर पैसा खर्च करून, साक्षी, पुरावे बदलणार. त्यांचा तसा लौकिक आहे; मग आपलं कसं होणार? सारख्या पुढच्या तारखा पडताहेत. वेळ, पैसा वाया जातोय.’ म्हणजे एकीकडे ती तरुणी प्रार्थना करतेय; पण दुसरीकडे तिची बुद्धी वास्तवात काय घडतंय, त्यानुसार विचार करतेय. म्हणजे दोन्ही मनांत विसंवाद आहे, म्हणून हवे ते घडत नाही.

पुढे तिला ‘एकमत’ असणे म्हणजे काय हे समजले आणि ती आपल्या खटल्यासंदर्भात नेमके काय घडणे अपेक्षित आहे, याचा विचार करू लागली. रात्री झोपेच्या आधी थोडा वेळ, ती जे हवे आहे फक्त त्याबद्दल विचार करू लागली. तसेच तिने आपल्या वकिलाबरोबरच्या चर्चेत एक कल्पनाचित्र मनात तयार केले. त्यात तिचे आणि वकिलाचे संभाषण असे. ते तिला म्हणत, ‘आपल्याला हवा तसा तोडगा निघाला आहे!’ रात्री हा सगळा विचार केला तरी दिवसा याबद्दल विचार करताना तिला पुन्हा भीती वाटायची की, या केसचे काय होणार? मग ती परत तेच कल्पनाचित्र मनोमन पाहायची.

बुद्धीला येणार्‍या शंका-कुशंका दूर सारून नेटाने हवे ते विचार करत राहायची. सतत विचार केल्याने या गोष्टी तिला खर्‍याच भासू लागल्या आणि काही दिवसांतच निकाल तिच्या बाजूने लागला. म्हणजे दुसर्‍या पार्टीने तिला हवा तसा तोडगा मान्य केला. ती तरुणी अतिशय आनंदी झाली. तिची प्रार्थना एकमत झाल्याबरोबर प्रत्यक्षात आली. हे प्रयत्नाने साध्य करता येते.

आजच्या काळात बहुतांश लोकांना ज्या समस्या प्रामुख्याने सतावतात, त्यात आर्थिक चणचण ही सर्वात वर असते. त्यामुळे हे लोक सतत ‘आपले काही बरे चाललेले नाही. कितीही कष्ट करा, पुरेसे पैसेच मिळत नाहीत.’ या आणि अशा प्रकारच्या विचारांच्या अधीन झालेले असतात. ही विधाने करताना ती वस्तुस्थिती असल्याने याच विचारांवर ते पूर्ण विश्वास ठेवत असतात.

खरं तर तुमच्या सुप्त मनाकडे अनेक चांगले विचार, कल्पना असतात. त्याच्याकडे सर्व गोष्टींचा ‘खजिना‘ आहे. जो कधीही संपणार नाही, यावर द़ृढविश्वास ठेवा. बरं, त्यातले तुम्हाला काही मिळू नये, असे तुम्ही काय केले आहे? ही सृष्टी, माणसं, सगळी एकाच ईश्वराची लेकरे असतील, तर त्यातला एक आनंदी, तर दुसरा दु:खी असे कसे असेल? देणारा देत असला तरी घेण्याची पात्रता आपणच निर्माण करायला नको का? पण माणसांचा स्वत:वर पुरेसा विश्वास नसतो. ‘माझं कुठलं एवढं चागलं असायला?’ ‘ते बघा, त्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरतेय.

आम्ही असेच कोरडे ठक्क.’ ही तुमची स्वत:बद्दलची भावना नकारात्मक आहेच; शिवाय तुमची त्यावर श्रद्धा आहे. मी पुरेसा नशीबवान नाही, हे तुम्ही ठरवलेलेच असेल तर काय करणार? त्यापेक्षा ‘मीसुद्धा श्रीमंत आहे, यशस्वी आहे. माझे पुरेसे पैसे शिल्लक आहेत.’ ही विधाने लक्षात ठेवा. हे सगळे घडायला तुम्ही पुरेसे लायक आहात याची जाणीव असू द्या. काही माणसे अक्षरश: राबराब राबतात, जबाबदार्‍या पुर्‍या करण्यासाठी झटत असतात; पण पुरेसा पैसा मिळवण्यात यशस्वी होत नाहीत. अशा लोकांचे संभाषण कधी तुम्ही ऐकले आहे का? ते नेहमी यशस्वी लोकांबद्दल मत्सराची भावना बाळगतात. त्यांचा हेवा करतात. ‘त्यांना हे यश काही चांगल्या मार्गाने मिळालेले नाही,’ अशी वाईट विचारांची अडगळ जर तुमच्या मनात साठली असेल, तर ताबडतोब ती काढायला सुरुवात करा. असे विचार एखाद्याबद्दल येऊ लागले की, सावध व्हा. तत्क्षणी ते विचार थांबवा.

ज्या एखाद्या माणसाबद्दल मत्सर वाटत असेल त्याच्या बाबतीत चांगला विचार करा. भले तो संपत्ती कोणत्याही मार्गाने मिळवत असू दे. त्याच्याशी तुम्हाला कर्तव्य नाही. ‘जो करेल तो भरेल’ हा सृष्टीचा नियम आहे. त्यासाठी तुम्ही नकारात्मक भावनांनी मन भरून टाकण्याची गरज नाही. उलट त्या व्यक्तीचे नेहमी चांगले असू दे, त्याचे भले होऊ दे, त्याची भरभराट होऊ दे, असे मनापासून म्हणा. जितके विचार स्वच्छ आणि चांगले तितकी मनाची भूमी सुपीक होत जाते आणि जिथे तुम्ही पेराल ते लगेच आणि भरभरून उगवते. माणसाचा स्वभाव असा असतो की, जे त्याला मिळत नाही, ते वाईट आहे असे समजतो किं वा ते मिळत नाही म्हणून सतत तक्रार करत राहतो. मात्र, या दोन्ही गोष्टींमुळे जे त्याला हवंय, ते त्याला मिळत नाही. कारण, ‘वाईट’ म्हणणे आणि ‘तक्रार करणे’ या दोन्हीही नकारात्मक भावना आहेत. त्यामुळे समजा, तुम्हाला पुरेसा पैसा हवा आहे, तर पैशाबद्दल फक्त होकारात्मकच विचार करणे आवश्यक आहे. योग्य ती भावना मनापासून आणि सतत बाळगली तर तुमचा पहिला प्राधान्यक्रम ‘पैसा’ असेल तर तो तुमच्याकडे चालून येईल.

काहींना काय हवंय ते समजतं; पण नेमकं कसं मागावं किंवा काय शब्द वापरावेत हे समजत नाही. तसंच बुद्धीने काही तरी शंका घेत प्रार्थना केली तर ती वाया जाते. म्हणून जे हवे आहे त्याचे आपण ‘हकदार’ आहोत आणि ते मिळवणारच आहे; किंबहुना मिळालेले आहे इतका द़ृढ, होकारात्मक विचार करणे ही आपली जबाबदारी आहे. पैसा आकर्षित करून घेण्यासाठीची प्रार्थना करताना सर्वसाधारणपणे अशी रषषळीारींळेपी हवीत. ‘मला पैसे आवडतात.’ ‘पैशावर माझे प्रेम आहे.’ ‘मी चांगल्या, योग्य मार्गाने भरपूर पैसे कमवतो.’ ‘दिवसेंदिवस माझ्या सर्व गरजा भागतील इतके पैसे मला मिळू लागले आहेेत.’ ‘माझ्याकडे पैशाचा ओघ सतत येत राहतो.’ ‘मी मला हवे ते खरेदी करतो. माझ्याकडे पुरेसा पैसा नेहमी असतो, त्यामुळे मी आनंदी आहे!’ ‘मी श्रीमंत आणि समृद्ध आहे!’ ‘मला सर्व काही भरभरून दिल्याबद्दल मी ईश्वराबद्दल कृतज्ञ आहे!’ ‘आभारी आहे, ‘आभारी आहे!’ अशी संपूर्णपणे सकारात्मक भावना हृदयाच्या तळापासून येऊ द्या, म्हणजे परिणाम लवकर दिसू लागतील.

याचबरोबर ‘पैसा म्हणजेच सर्व काही’ असे मात्र समजू नका. पैसा हे सर्व गरजा पूर्ण करण्याचे फक्त एक माध्यम आहे. संपत्तीबरोबरच आनंद, शांती, प्रेम, सुद़ृढ नातेसंबंध हे सगळंही तुमच्या आयुष्यात असले पाहिजे. हे सगळे कसे मिळवायचे ते क्रमश: जाणून घेऊया पुढील भागात.

Back to top button