Stock Market Updates | इराण- इस्रायल युद्धाचे भारतातही पडसाद, सेन्सेक्स, निफ्टी गडगडले; गुंतवणूकदारांनी १५ मिनिटांत गमावले ६ लाख कोटी | पुढारी

Stock Market Updates | इराण- इस्रायल युद्धाचे भारतातही पडसाद, सेन्सेक्स, निफ्टी गडगडले; गुंतवणूकदारांनी १५ मिनिटांत गमावले ६ लाख कोटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराण- इस्रायल संघर्षाचे (Iran-Israel conflict) तीव्र पडसाद आज सोमवारी (दि. १५) भारतीय शेअर बाजारात दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) तब्बल ८०० अंकांनी घसरून ७३,४०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० (Nifty) निर्देशांक २२,३५० च्या पातळीवर आला. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स काही प्रमाणात सावरुन ७३,६६० वर व्यवहार करत होता. (Stock Market Updates)

भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांची सोमवारी आठवड्याची सुरुवात घसरणीसह झाली. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर प्रादेशिक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. परिणामी बाजाराचा मूड बिघडला.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ६ लाख कोटींनी कमी होऊन ३९३.७७ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. बाजारातील सुरुवातीच्या १५ मिनिटांत व्यवहारात गुंतवणूकदारांना हा मोठा फटका बसला.

सेन्सेक्स आज ७३,३१५ वर खुला झाला. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास तो ७३,६६० वर होता. सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टीसीएस, नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली.

निफ्टीवर टाटा कन्झ्यूमर, टाटा मोटर्स, बीपीसीएल, अदानी एंटरप्रायजेस, बजाज फिनसर्व्ह हे टॉप लूजर्स आहेत. तर ओएनजीसी, हिंदाल्को, टीसीएस हे शेअर्स तेजीत आहेत.

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी पीएययू बँक, रियल्टी, मीडिया हे निर्देशांक २ टक्के घसरणीसह खुले झाले. निफ्टी ऑटो, फायनान्सियल, मेटल फार्मा, गॅस आणि ऑईल हेही घसरले. (Stock Market Updates)

आशियाई बाजार गडगडले

इराणने इस्रायलविरुद्ध सूड उगवत भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री ३ वाजता इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे मिळून एकापाठोपाठ ३०० हल्ले केले. याचे पडसाद आशियाई बाजारात उमटले आहेत. भारतासह आशियाई बाजारात घसरण झाली आहे. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुरुवातीला सुमारे १ टक्क्यानी घसरला.

हे ही वाचा :

 

Back to top button