Iran-Israel tensions | इराण-इस्रायल संघर्ष भडकला; इस्रायलवर 300 क्षेपणास्त्रे डागली! | पुढारी

Iran-Israel tensions | इराण-इस्रायल संघर्ष भडकला; इस्रायलवर 300 क्षेपणास्त्रे डागली!

तेहरान/तेल अवीव; वृत्तसंस्था : इराणने अखेर इस्रायलविरुद्ध सूड उगविलाच. भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री 3 वाजता इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे मिळून एकापाठोपाठ 300 हल्ले केले. अमेरिकन लष्कराने यापैकी अनेक ड्रोन कोसळण्यापूर्वी हवेतच पाडले; तर इस्रायलच्या आयर्न डोमने तसेच एअरो 3 डिफेन्स सिस्टीमने इराणच्या क्षेपणास्त्रांचा मारा रोखला.

इराणचा 99 टक्के मारा आम्ही हवेतच निष्प्रभ केला. बहुतांश ड्रोन, क्षेपणास्त्रे वाटेतच पाडली, असे इस्रायलच्या लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलेले आहे. इराणच्या एका हल्ल्यात इस्रायलच्या नेगेव या वाळवंटी भागातील नेवातीम हवाई तळाचे काही प्रमाणात नुकसान झाले. पळापळ होऊन त्यात 12 जण जखमी झाले. इराणने सोडलेल्या काही ड्रोन्सना वाटेत सीरिया आणि जॉर्डनमध्येच पाडण्यात आल्याचे टाईम्स ऑफ इस्रायलने आपल्या वृत्तात म्हटलेले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताने इस्रायली अधिकार्‍यांचा संदर्भ देऊन प्रकाशित केलेल्या वृत्तात, इराणने 185 ड्रोन रवाना केले आणि 36 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, असे म्हटलेले आहे. बहुतांश आयुधांचे प्रक्षेपण इराणमधूनच करण्यात आले होते. काही शस्त्रे मात्र इराक आणि येमेनमधूनही डागली गेली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी 110 क्षेपणास्त्रे इराणने डागली, असेही या वृत्तात नमूद आहे.
इराणने या हल्ल्यांना ऑपरेशन ट्रू प्रॉमिस (वचनपूर्ती मोहीम) असे नाव दिले होते. खरे तर इस्रायलने 1 एप्रिल रोजी सीरियातील इराणी दूतावासालगत क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यात इराणच्या 2 मुख्य लष्करी कमांडर्ससह 13 लोक मारले गेले होते. इस्रायलला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. आम्हीही हल्ले करणार, अशी धमकी तेव्हाच इराणकडून देण्यात आली होती. अमेरिकेने या वादात पडू नये. अन्यथा अमेरिकेलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशाराही इराणने दिला होता. अमेरिकेने चीन तसेच सौदी अरेबियाला हा वाद मिटविण्याची गळ घातली होतीच; पण याउपरही इराणने इस्रायलवर हल्ला केल्यास आम्ही मध्ये पडू आणि इराणशी लढू, असेही ठणकावून सांगितले होते. इराण इस्रायलवर हल्ला करणारच म्हटल्यावर अमेरिकेने आपली विशेष युद्धनौका इस्रायलच्या मदतीसाठी तत्काळ रवानाही केली होती. मध्य पूर्व आशियातील आपल्या विविध लष्करी तळांनाही इस्रायलच्या मदतीसाठी तत्पर राहाण्याचा अलर्टही अमेरिकेने जारी केला होता.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. अनेक सदस्यांनी इराणवर प्रतिहल्ल्याची सूचना केली; पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून झालेल्या बोलणीनंतर प्रतिहल्ला स्थगित करण्यात आला. मित्रराष्ट्रांशी चर्चा करूनच यासंबंधीचा निर्णय घेऊ, असे नेतान्याहू यांनी सांगितले.
दुसरीकडे इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणमधील तेहरानसह विविध शहरांत लोकांनी एकच जल्लोष केला. इराणच्या संसदेत इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाका, अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. कामकाज सुरू होताच डेथ टू इस्रायल, डेथ टू अमेरिका, असा एकच गलका सदस्यांनी केला.

आम्ही केलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलचे 836 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावा इराणची सरकारी माध्यम संस्था इर्नाने केला आहे. इस्रायलच्या अराद, अल-फहम शहरावर काही क्षेपणास्त्रे पडली. लोकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण होते.

भारतीयांसाठी हेल्पलाईन

इस्रायलमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. सुरक्षा नियमावलीचे पालन भारतीय नागरिकांनी करावे, असेही सुचविले आहे. इराणच्या हल्ल्यानंतर सुमारे 7 तासांनी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता इस्रायलने आपली हवाई हद्द पुन्हा खुली केली.

संयुक्त राष्ट्रांकडून निषेध

संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. इराणने हे हल्ले तातडीने थांबवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

आता हल्ले नाही : इराण

संयुक्त राष्ट्रांत हल्ल्यामागची भूमिका इराणने स्पष्ट केली. इराणच्या दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा सूड आम्ही घेतला. यूएन चार्टरनुसार आम्हाला स्वत:च्या बचावाचा हक्क आहे. आमच्याकडून विषय आता संपलेला आहे; पण इस्रायलने प्रत्युत्तर दिले तर आम्ही आणखी मोठे हल्ले चढवू, असे इराणचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत आमीर सईद यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना इराणने एक निवेदनही दिले. आम्हाला हे प्रकरण वाढवायचे नाही, असे त्यात म्हटलेले आहे. दुसरीकडे, नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीने इराणविरुद्ध आम्ही आमची हवाई हद्द कुणालाही वापरायला देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Back to top button