BRINJAL : मेंदूच्या आरोग्यासाठीही वांगी गुणकारी | पुढारी

BRINJAL : मेंदूच्या आरोग्यासाठीही वांगी गुणकारी

नवी दिल्ली : मेंदूच्या आरोग्यासाठी कोणता आहार चांगला असे म्हटले तर अनेक वेळा फॅटी फिश म्हणजेच अधिक चरबीयुक्त सागरी मासे हेच उत्तर येत असते. मत्स्याहारातून ‘ओमेगा 3 फॅटी असिड’ मिळते जे मेंदूसाठी गुणकारी असते. अक्रोडातूनही असे पौष्टिक तत्त्व मिळत असते. मात्र, आपल्या नेहमीच्या जेवणातही जी भाजी असते ती सुद्धा मेंदूसाठी गुणकारी असते हे तुम्हाला माहिती आहे का? सहसा जेवणात हटकून येणारी भाजी म्हणजे वांगी. बाजारात आढळणारी ही एक सामान्य भाजी. या भाजीमुळेही मेंदूची शक्ती वाढते तसेच वांग्यामुळे शुगर आणि वजन कमी करण्यातही मदत मिळते, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे.

वांगी खाणे काहींना आवडते तर काहींना नाही. आपल्याकडील मसाला भरून केलेले झणझणीत वांगे असो किंवा बंगालमधील ‘बेगुन भाजा’ या नावाने समोर येणारे वांग्याचे तळलेले काप किंवा काचर्‍या असोत, वांग्याचे अनेक पदार्थ आपल्या देशात पाहायला मिळतात. अर्थात केवळ चवीसाठी किंवा उदरभरणासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही वांगी गुणकारी ठरतात. स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी वांगे अतिशय लाभदायक आहे.

तज्ज्ञांच्या मते, वांग्यामध्ये आढळणार एंथोसायनिन आणि नासुनिन हे एन्झाईम मेंदूच्या पेशींना मदत करतात. सोबतच मेंदूच्या पेशींना डिटॉक्स करण्यासोबत वांग्याच्या मदतीने मेंदूमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होते. यामुळे मेमरी पॉवर वाढते आणि मेंदूचे आजार दूर होतात. वांग्यामध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट एन्झाईम मेंदू मजबूत करण्यास मदत करतो. तसेच मेंदूची कार्यक्षमताही वाढवतो.

वांगे हे मेंदूच्या विकासासोबत हाडांच्या विकासासाठीही फायदेशीर आहे. वांग्यामध्ये आढळणारे ‘फेनोलिक’ नावाचे एन्झाईम हाडांची घनता वाढवते आणि यामुळे हाडे मजबूत होतात. वांग्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.

वांग्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यातील बायोफ्लॅवेनॉईड्स रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे हार्टअ‍ॅटॅकचा धोका कमी होतो. यातील क्लोरोजेनिक एन्झाईम खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदय निरोगी राहते.

Back to top button