प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रतिज्ञापत्र सादर करणार्‍यावर गुन्हा.. | पुढारी

प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रतिज्ञापत्र सादर करणार्‍यावर गुन्हा..

भोर : पुढारी वृत्तसेवा : प्रकल्पग्रस्त दाखला मिळविण्यासाठी कुटुंबाच्या वंशावळीचे अपूर्ण व दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची दिशाभूल करणार्‍या व्यक्तीवर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश संतोष दानवले (रा. बारे बुद्रुक, ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी सुनील नारायण धर्मकांबळे यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दानवले यांनी भोर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जासोबत त्यांनी दिलेल्या दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये मयत महादु बाळु दानवले यांच्या वारसांच्या वंशावळीची माहिती देऊन प्रकल्पग्रस्त दाखला मिळवला. मयत महादु बाळू दानवले यांच्या वारसांची वंशावळ ही अपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचा तक्रारी अर्ज रामदास उत्तम दानवले (रा. 513, श्रीकृष्णा सहकारी गृहनिर्माण संस्था, महावीरनगर, कांदिवली पश्चिम) यांनी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडे दाखल केला. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. 8 जानेवारी 2023 रोजी स्थानिक चौकशी केली असता मयत महादु बाळा दानवले यांना इतरही वारसदार आहेत हे आढळून आले.

ऋषीकेश दानवले यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळविण्याकरिता प्रतिज्ञापत्रामध्ये वंशावळीची अपूर्ण माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली असल्याचे दिसून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. एम.चव्हाण करीत आहेत. या कारवाईबद्दल भाटघर धरणग्रस्त व पीडित कुटुंबाने विशेषतः मूळ प्रकल्पग्रस्त मयत महादू बाळा दानवले यांचा 95 वर्षांचा मुलगा पदु महादू दानवले यांनी भोरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडलअधिकारी तसेच पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच या प्रकरणातील गैरकृत्यात सहभागी असणार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button