धक्कादायक ! सिगारेटसाठी कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा | पुढारी

धक्कादायक ! सिगारेटसाठी कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मासे विक्री करत असलेल्या व्यक्तीने सिगारेट आणून दिली नाही, या कारणावरून ऊसतोडीच्या कोयत्याने त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याने वार चुकवल्यानंतर त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकाविरोधात शस्त्र अधिनियमासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित ऊर्फ कोच्या प्रदीप कुदळे (रा. सहयोग सोसायटीचे मागे, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत संजय नारायण वायकर (रा. 29 फाटा, गुणवडी, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दि. 6 रोजी रात्री ही घटना घडली. वायकर हे बारामती-इंदापूर रस्त्यावर बारामती अ‍ॅग्रोसमोर मासे विक्री करत असताना कुदळे हा तेथे आला. त्याने मला सिगारेट आणून दे, अशी मागणी वायकर यांच्याकडे केली. मी मासे विक्री करत आहे, तुझा तू सिगारेट आण, असे वायकर म्हणाले असता त्याने निळी मूठ असलेला ऊसतोडीचा कोयता काढून उजव्या खांद्यावर मारण्याचा प्रयत्न केला. वायकर हे लागलीच मागे सरकल्याने हा घाव चुकला. ते खाली पडल्यावर त्यांना हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. फिर्यादीचा मुलगा सुरेश याने त्याच्या तावडीतून वडिलांची सुटका करत पोलिसांना फोन केला.

हेही वाचा

Back to top button