रत्नागिरी : धनुष्यबाणावरच लढणार उमेदवार : ना. उदय सामंत | पुढारी

रत्नागिरी : धनुष्यबाणावरच लढणार उमेदवार : ना. उदय सामंत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, नाशिक या जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरू असून, येत्या दोन-चार दिवसांत हा तिढा सुटेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये धनुष्यबाण चिन्हावरच उमेदवार असेल, असाही दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांचीही यावर चर्चा सुरू असून, याचा निर्णय येत्या दोन-चार दिवसांत घेतला जाईल, असेही ना. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी येथील नववर्षाच्या शोभायात्रेत ना. सामंत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी रत्नागिरीसह राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पुढील गुढीपाडव्यालाही नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान असतील, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरीत आलेल्या ना. सामंत यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लढण्यास शिवसेनेसह भाजप ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून महायुतीचा प्रचार सुरू आहे.
या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार, असेही ना. सामंत यांनी सांगितले. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मात्र, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असा महायुतीचा एकत्र प्रचार वेगाने सुरू होईल. तोपर्यंत प्रत्येकजण वेगळे – वेगळे का असेना महायुतीचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button