सोलापूर : ढोकी स्थानकात हरंगुळ-पुणे एक्सप्रेसमधून धूर; प्रवाशांमध्ये घबराट | पुढारी

सोलापूर : ढोकी स्थानकात हरंगुळ-पुणे एक्सप्रेसमधून धूर; प्रवाशांमध्ये घबराट

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : हरंगुळ-पुणे एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. ही घटना ढोकी स्थानकाजवळ आज (दि.५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. डबा काढून गाडी संध्याकाळी ७.१५ वाजता ढोकी स्थानकावरुन रवाना झाली. यामुळे ३ तास ५० मिनिटे गाडी उशीराने धावत असल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01488 हरंगुळ-पुणे एक्सप्रेस दुपारी 3 च्या दरम्यान पुण्याच्या दिशेने निघाली. ढोकी स्थानक येताच अचानक आरक्षित डब्याखालून धूर निघत असल्याचे प्रवाशांच्या व गार्डच्या लक्षात आले. यावेळी गार्डने रेल्वे चालकास व रेल्वे प्रशासनाला ही बाब सांगितली. त्यानंतर रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची पाहणी करून तात्काळ उपायोजना केल्या.

हरंगुळ – पुणे एक्सप्रेस खोळंबल्याने या गाडीला लिंक असलेली गाडी क्रमांक 17629 पुणे – नांदेड एक्सप्रेसलाही पुणे स्थानकावरून रात्री १.३५ वाजता निघणार असल्याने जवळपास ४ तास उशिराने पुणे स्थानकावरून निघणार आहे. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जास्त दबाव आल्यामुळे आणि जास्त घर्षण झाल्यामुळे ब्रेक बाइंडिंगमधून धूर निघ लागला. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, धूर निघत असलेल्या डब्याची तातडीने तपासणी करून डबा बाजूला करून दुसरा डबा जोडून ही गाडी तात्काळ पुण्याच्या दिशेने सोडण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button