टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : टेंभुर्णी बस स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांचे दागिने, रोख रक्कमेची चोरी, महिला, शाळेतील मुली यांची छेडछाड, टवाळगिरी अशा घटना सतत घडत आहेत. सोमवारी (दि. १) एका महिलेच्या पर्समधून सव्वा सहा तोळ्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यातील ५० वर्षीय नोकरदार महिलेच्या बाबत ही घटना घडली आहे. वर्षा रविंद्र गायकवाड (वय ५० रा.सेनापती बापट मार्ग, जि.पुणे) येथील त्या रहिवासी आहेत. टेंभुर्णीत बहिणीच्या वास्तू शांती कार्यक्रमास आल्या होत्या. कार्यक्रम आटोपून पुण्यास परत निघाल्या असता टेंभुर्णी बस स्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या पर्स मधील दागिन्यांचे पाकीट चोरी केले. दागिने व पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बस स्थानकात जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एका गुलाबी कुडता, पांढरी सलवार व तोंडास पांढरी ओढणी लावलेल्या अनोळखी महिलेने चोरी केले असल्याचे आढळून आले. ही महिला बसमधून न जाता खाली उतरत लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाली. टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली असून सपोफौ विलास रणदिवे हे अधिक तपास करीत आहेत.