

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार यांनी शुक्रवारी (दि. ५) सोलापूर स्थानकाची बारकाईने पाहणी करत गतिशक्ती युनिट अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व कामांना गती देण्यावर व प्रवाशांच्या सुरक्षेवर तसेच स्वच्छतेवर विशेष भर देण्याच्या सूचना यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या. Solapur Railway Station
दरम्यान, या पाहणी दरम्यान त्यांनी सोलापूर स्थानकावरील फलाट क्रमांक चार-पाच, पार्सल ऑफिस, गुड्स शेड, पुनर्विकास कामे, स्टेशन परिसर यासह जन आहार, एटीव्हीएम मशीन, खाद्यपदार्थाचे स्टॉल व जन औषधी केंद्र, विक्रेत्यांच्या आयर्ड, वेटिंग रूम, यांची बारकाईने पाहणी करून पाहणीत आढळलेल्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. व प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती त्यांनी यावेळी घेतली. तसेच सोलापूर स्थानकावरील सुरू असलेली गतिशक्तीची विकासकामे, पायाभूत सुविधांची कामे, प्रकल्प आणि प्रवासी सुविधा आदींची माहिती घेऊन आढावा घेतला. Solapur Railway Station
तसेच आरक्षण केंद्राच्या बाजूला नव्याने होत असलेल्या १२ मीटर ब्रिजच्या कामाची माहिती घेतली आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी सर्वप्रथम लिफ्ट बसविण्यात येणार असून त्यानंतर जुना पादाचारीपूल हटविण्यात येणार असून त्यानंतर १२ मीटर पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक सुदर्शन देशपांडे, स्टेशन मॅनेजर, यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
रेल्वे स्थानकाच्या परिसरात जवळपास 30 दुचाकी या बेवारस स्थितीत असून, या गाड्यांच्या मालकांचा शोध घेतला असता त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे येत्या काळात या गाड्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार यांनी सांगितले. तसेच स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या दुचाकी, रिक्षा अशा गाड्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
हेही वाचा