मोबाईल फोडला म्हणून त्याने मित्रालाच संपवल; आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक | पुढारी

मोबाईल फोडला म्हणून त्याने मित्रालाच संपवल; आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक

चाकण : पुढारी वृत्तसेवा : मोबाईल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत राहणार्‍या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला. ही घटना दि. 28 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली. खून केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यातून अटक केली आहे.कालू मंगल रकेवार (वय 23, सध्या रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड; मूळ रा. पथरीया, ता. जि. दमोह, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, रामसिंग सुलतानसिंग गोंड (वय 30, रा. रेयाना, ता. जि. दमोह, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कालूचा भाऊ पप्पू मंगल रकेवार (वय 40, सध्या रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड; मूळ रा. पथरीया, ता. जि. दमोह, मध्य प्रदेश) यांनी महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पप्पू, कालू आणि रामसिंग हे तिघे एकाच कंपनीत ठेकेदारीवर काम करीत होते. तिघेही एकाच खोलीत राहत होते. दि. 26 मार्चदरम्यान रामसिंग याने कालूचा मोबाईल फोडला. त्यानंतर दि. 28 मार्च रोजी कालूने रामसिंगचा मोबाईल फोडला. कालूचा भाऊ फिर्यादी भाजी आणण्यासाठी बाहेर गेला होता. मोबाईल फोडल्याच्या कारणावरून कालू आणि रामसिंग यांच्यात वाद झाला. भाजी घेऊन पप्पू रात्री 10 वाजता घरी आला. त्या वेळी कालू हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. रामसिंग हा कालूच्या छातीवर बसून त्याला लोखंडी तव्याने मारहाण करीत होता. तसेच कालूच्या गळ्याभोवती कपड्याने आवळून मारण्याचा प्रयत्न करीत होता. खून केल्यानंतर रामसिंग पळून गेला.

गुन्हे शाखेने आरोपी रामसिंगला अटक करण्यासाठी दोन पथके तयार केली. रामसिंगने मोबाईल फोन बंद केल्याने त्याचे तांत्रिक विश्लेषण देखील करता येत नव्हते. गुन्हे शाखा युनिट-3 चे एक पथक मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यात रियाना गावात पोहचले. त्या वेळी रामसिंग हा पोलिसांची चाहूल लागल्याने तिथूनही पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा

Back to top button