Loksabha election : महायुतीचे कार्यकर्ते सैरभैर; ‘या’ माजी मंत्र्यांचा लागणार कस | पुढारी

Loksabha election : महायुतीचे कार्यकर्ते सैरभैर; 'या' माजी मंत्र्यांचा लागणार कस

जावेद मुलाणी

इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात लोकसभेच्या अगोदर विधानसभेची चर्चा प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे दोघेही महायुतीमध्ये असले, तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मात्र सैरभैर असल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यात महायुतीला बळ मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. लोकसभेला एकत्र आलेले हे नेते विधानसभेला नेमके काय करणार? याची उत्सुकता इंदापूरकरांना लागून राहिली आहे.

इंदापुरात येणार का बळ? भाजपच्या गोटात चैतन्य; विधानसभेला काय होणार ही उत्सुकता भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अगोदर विधानसभेचे बोला, असा पवित्रा घेत संकल्प मेळावे घेतले. दोनवेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्या. या वेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी, समस्या, तक्रारी, काम करताना होणारा अडथळा, याचा पाढा सागर बंगल्यावर फडणीस यांच्यासमोर वाचला. संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी मी इंदापूरचे पालकत्व स्वीकारत असून, तुमच्या मनात हर्षवर्धन पाटील यांना आमदारकी मिळावी; मात्र माझ्या मनात त्याच्या पुढचा विचार आहे, असे म्हणून लोकसभेला महायुती म्हणून काम करा, असा संदेश त्यांनी दिला.

या सागर बंगल्यावरील फडणवीस यांच्या मिळालेल्या ऊर्जेमुळे भाजपच्या गोटात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, त्यांचे कार्यकर्ते हळूहळू महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे बोलू लागले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील आपली सावध भूमिका घेत आपल्यासह पत्नी सारिका भरणे यांना प्रचारात उतरवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी
सुनेत्रा पवार ह्या लोकसभेच्या उमेदवार असल्याने अजित पवारांचा शब्द शस्त्र मानून तालुक्यात फिरू लागले आहेत. एकंदरीत, महायुतीत इंदापूरचे आजी-माजी आमदार एकत्र असले, तरी या दोघांचाही विधानसभेसाठी आपल्या पक्षाचा मतांचा ’परफॉर्मन्स’ दाखविण्याची संधी असल्याने हे दोघेही आपल्या परीने काम करून यातूनच आपण केलेल्या कामाची पावती म्हणून आपल्या पक्षाचे वरिष्ठ विधानसभेला संधी देतील म्हणून दोघेही मरगळ झटकून कामाला लागणार का? याची चर्चा इंदापुरात रंगली आहे.

युवानेते कधी फुंकताहेत तुतारी, तर कधी देताहेत घड्याळाला चावी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटात एक युवानेता सक्रिय झाला होता. त्यांनी तसे तालुकाभर दौरे काढत आपले वलय निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, इंदापुरातील महाविकास आघाडीच्या शरद पवार, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी मेळाव्यालाच ते गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हा युवानेता सध्या शांत असला, तरी काही दिवसांत ’गड्या आपले घड्याळच बरे’ असे म्हणत सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा

Back to top button