पाषाण तलाव जलपर्णीमुक्त होण्याच्या मार्गावर; 50 ते 60 टक्के परिसर स्वच्छ | पुढारी

पाषाण तलाव जलपर्णीमुक्त होण्याच्या मार्गावर; 50 ते 60 टक्के परिसर स्वच्छ

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यास प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरुवात केली असून, जवळपास 50 ते 60 टक्के जलपर्णी काढण्यात आली असल्याचे लक्षात येत आहे. उर्वरित काम येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होऊन पाषाण तलाव जलपर्णीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पाषाण तलावावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. या वर्षी महापालिका प्रशासनाला लवकर जाग आल्यामुळे जवळपास 50 ते 60 टक्के जलपर्णी काढण्यात यश मिळवले आहे. दोन पोकलँड, दोन जेसीबी, चार डंपरच्या साहाय्याने दररोज जलपर्णी काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

जलपर्णी काढून इतर ठिकाणी नेली जात असल्याने ती पुन्हा वाढण्याचा धोकाही कमी झाला आहे. दरवर्षी पाऊस आल्यावर वाहून जाणारी जलपर्णी मात्र या वेळी पूर्णतः काढून होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगत आहेत. साधारणतः पुढील 15 ते 20 दिवसांत पूर्णतः पाषाण तलाव जलपर्णीमुक्त होईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. याबाबत संबंधित अधिकार्‍यांनी माहिती देताना सांगितले की, पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी वर्षभरासाठी जवळपास एक कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्यातूनच सध्या हे काम सुरू असून, लवकरात लवकर जलपर्णीमुक्त तलाव आपणास दिसेल.

दरवर्षी पाषाण तालवावरील जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु, जलपर्णी होणारच नाही, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तलावात येणारे दूषित पाणी लवकरात लवकर थांबवून मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारल्यास जलपर्णीवर आळा घालता येईल.

– रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका

हेही वाचा

Back to top button