Pune : दुष्काळातही तीन एकरांत 45 टन कांदा उत्पादन.. | पुढारी

Pune : दुष्काळातही तीन एकरांत 45 टन कांदा उत्पादन..

दिवे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनाच कांदा विकत घेऊन खाण्याची वेळ आली आहे. मात्र, तालुक्याच्या पश्चिम भागातील एक-दोन गावांत थोडाफार पाऊस झाल्याने पाणीपातळी टिकून होती, त्यामुळे कोडीत व गराडे परिसरात काही शेतकर्‍यांनी 800 ते 900 पिशवी म्हणजे 40 ते 45 टन कांदा उत्पादन मिळविले. मात्र, सध्या समाधानकारक बाजारभाव नसल्याने त्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिला आहे. गराडे येथील प्रगतिशील शेतकरी मारुती घारे आणि मधुमती घारे या दाम्पत्याने तीन एकर क्षेत्रावर कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेतले.

त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त शेणखताचा वापर व कमीत कमी रासायनिक खतांचा वापर केला. जमिनीची चांगली मशागत करून शेणखत टाकून बेड तयार करून घेतले. पाण्याची कमतरता असल्याने पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत केली. साधारण 15 दिवसांच्या अंतराने कांद्याला पाणी सोडले. मार्च महिन्यात प्रत्यक्ष कांदा काढणीयोग्य झाला. मालाचा आकार आणि रंग अतिशय दर्जेदार होता. उत्पादनही 800 ते 900 पिशवी म्हणजे 40 ते 45 टन मिळाले.

निर्यातबंदी उठण्याकडे लक्ष

निर्यातबंदीचा फटका या कांदा उत्पादकांना बसला. कांदा जर विकला तर उत्पादन खर्चदेखील निघणार नाही, अशी अवस्था होती. त्यामुळे घारे दाम्पत्याने सर्वच्या सर्व कांदा वखारीत साठवून ठेवला आहे. भविष्यात निर्यातबंदी उठवली जाईल आणि आपल्या हातात चार पैसे जास्त पडतील, या आशेवर या दाम्पत्याने कांद्याची साठवणूक केली. या सर्व कामात मारुती घारे यांचा मुलगा निखिल घारे हादेखील त्यांना मदत करत असतो.

हेही वाता

Back to top button