वेध लोकसभेचे-१९९१ ला दोन महिला उमेदवार विजयी | पुढारी

वेध लोकसभेचे-१९९१ ला दोन महिला उमेदवार विजयी

उमेश काळे

१९९१ च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल ते म्हणजे मराठवाड्यातील नांदेड, बीड मतदारसंघातून मतदारांनी महिला उमेदवारांना लोकसभेत पाठविले. नांदेडमधून सूर्यकांता पाटील, बीडमधून केशरकाकू क्षीरसागर विजयी झाल्या. केशरकाकू १९८०, १९८४ मध्ये निवडून आल्या होत्या. याशिवाय त्या काही काळ आमदारही होत्या. त्याचप्रमाणे सूर्यकांता पाटील यांनाही आमदार आणि राज्यसभेचा अनुभव होता. उर्वरित महाराष्ट्रातून प्रतिभा पाटील (अमरावती) या एकमेवर विजयी झाल्या होत्या.

कोळसे पाटील रिंगणात

या निवडणुकीत नमूद करण्यासारखी बाब म्हणजे न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना जनता दलाने बीडमधून दिलेली उमेदवारी. पुणे येथे विधी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोळसे पाटील यांची वकिलीची कारकिर्दही चांगलीच गाजली. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुणे येथील जोशी- अभ्यंकर खून खटल्यासारख्या प्रकरणात त्यांनी कसब पणाला लावले होते. १९८१ ते १९८५ या काळात सरकारी वकील म्हणून काम केल्यानंतर त्यांची नियुक्‍ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या पदावर झाली. पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्यास वेळ मिळावा म्हणून त्यांनी १९९० मध्ये न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच बीड लोकसभेसाठी ते उभे राहिले. या निवडणुकीत त्यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली.

केशरकाकू यांना २६०,०३५, भाजपचे सदाशिव मुंडे यांना १७२,४०९ तर न्या. कोळसे यांना १३६,५७३ मते पडली होती. मागील निवडणुकीत वंचितने त्यांना संभाजीनगरातून उमेदवारी जाहीर केली. पण नंतर वंचितने इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर ते वंचितमधून बाहेर पडले.

बीडची लढत तीन महिलांमध्ये

१९९६ ला मात्र भाजपने राजकीय खेळी करीत बीडमधून काँग्रेसचे माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे केशरकाकू आणि शेकापच्या सुशिला मोराळे या अन्य प्रमुख उमेदवार होत्या. ५७ हजार ४६० मतांनी रजनी पाटील या विजयी झाल्या आणि बीडची जागा प्रथमच भाजपकडे आली. १९९६ नंतर रजनी पाटील या काँग्रेसवासी झाल्या. काँग्रेस पक्षाने त्यांच्याकडे केंद्रीय स्तरावरील जबाबदारी दिली. सोनिया गांधी यांच्या वर्तुळात त्या वावरत असतात. आताचाही विचार करता मागील दोन टर्म डॉ. प्रीतम मुंडे या बीडच्या प्रतिनिधीत्व करीत आहेत. यंदा पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. डॉ. ज्योती मेटे यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब झाल्यास बीडची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

सूर्यकांता पाटील यांना इंदिराजींची साथ

सूर्यकांता पाटील यांचे आजोबा माधवराव पाटील १९५१ साली शंकरराव चव्हाण यांचा पराभव करून हैदराबाद स्टेट विधानसभेवर विजयी झाले होते. हदगाव हा त्यांचा मतदारसंघ. याच मतदारसंघातून १९५७ ला त्यांच्या आई अंजनाबाई यांनी शामराव बोधनकर यांचा पराभव केला. १९८० ला सूर्यकांता पाटील या बापूराव पाटील आष्टीकर यांचा पराभव करून विजयी झाल्या. सूर्यकांता पाटील आमदार कशा झाल्या याचीही एक स्टोरी आहे. आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात त्यांचा एक कार्यक्रम नांदेडला आयोजित करण्यात आला होता. पण इंदिराजींचे हेलिकॉप्टर भरकटले व ते वसमतला उतरले. तेथे स्थानिक नेते मुंजाजीराव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. तोपर्यंत सूर्यकांता पाटील कारने वसमत येथे दाखल झाल्या. त्या इंदिराजींना नांदेड येथे विश्रामगृहावर घेऊन गेल्या. तेथे गेल्यावर इंदिराजींना फ्रेश व्हायचे होते. त्यावेळी इंदिराजींनी त्यांच्याकडे साडी मागितली. सूर्यकांताबाईंनी तातडीने साड्या आणल्यावर ‘मै ऐसे साडी पहनती हूँ क्या,’ असे इंदिराजी म्हणाल्या. ‘तू ऐसा कर…बाहर जा.. मै नहाती हूँ..साडी सुखाने के लिए मेरी मदद कर, ’ असे त्या सूर्यकांता यांना म्हणाल्या. त्यानंतर दरवाजा बंद करून इंदिराजी फ्रेश झाल्या व त्यांनी साडी धुतली.

त्यानंतर खोलीतील पंख्याचा स्पिड वाढवून सूर्यकांता व त्यांनी साडी वाळविली. हा प्रसंग लक्षात ठेवत इंदिरा गांधी यांनी नंतरच्या विधानसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील यांना हदगाव तर मुंजाजीराव जाधवांना वसमतमधून उमेदवारी दिली. पहिल्यांदा तू विधानसभा लढव, मग लोकसभेचे बघू असा सल्ल्‍ला त्यांनी दिला.

हिंगोलीचे प्रतिनिधीत्व

१९९१ ला नांदेड जिंकलेल्या सूर्यकांता पाटील या १९९८ आणि २००४ मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. १९८६ मध्ये त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधीत्व केले होते. डॉ. मनमोहन सिंह मंत्रिमंडळात त्या राष्ट्रवादी कोट्यातून राज्यमंत्री झाल्या. ग्रामीण विकास, संसदीय मंत्रालयाचे कामकाज त्यांनी सांभाळले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा प्रवास करणार्‍या सूर्यकांता पाटील यांना भाजपकडून जास्त अपेक्षा होत्या. त्या फोल ठरल्या. २८ मे, २०२० मध्ये त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्‍त करताना म्हटले होते, ‘४३ वर्ष राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४००० हजारांच्या थाटात नेसली, मिळालेले काम मन लावून केले, आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता. पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा… ’

राजकीय जीवनातून बाहेर पडण्याचे संकेत देतानाच समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या भावना व्यक्‍त केल्यानंतरही त्यांच्या वाटेला उपेक्षाच आली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना पक्षात राहूनच त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या सूर्यकांता पाटील यांना भाजपने का सामावून घेतले नाही हा अनुत्तरीत प्रश्‍न आहे.

 

Back to top button