उन्हाळ्यातील मुलांचे डिहायड्रेशन; | पुढारी

उन्हाळ्यातील मुलांचे डिहायड्रेशन;

डॉ. तुषार पारीख

उन्हाळ्यात मुलांच्या शरीराचे योग्य हायड्रेशन राखणे महत्त्वाचे आहे. या महिन्यांत निर्जलीकरण होण्याची अधिक शक्यता असते. प्रौढांच्या तुलनेत मुलांच्या शरीरात पाण्याची टक्केवारी जास्त असते, ज्यामुळे त्यांच्यासाठी पुरेशी हायड्रेशन पातळी राखणे आवश्यक आहे.

डिहायड्रेशनमुळे मुलांमध्ये थकवा, चिडचिड आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे, अशा प्रकारचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उन्हाळ्यात घराबाहेर खेळताना अतिरिक्त घामामुळे शरीरातील द्रव कमी होते. यामुळे मुले दिवसभर पुरेसे पाणी पीत आहेत याची खात्री करणे, पालकांसाठी अधिक महत्त्वाचे ठरते. तहान लागण्याआधीच मुलांना नियमितपणे पाणी पिण्याची सवय लावावी. कारण, तहान ही मुलांमधील डिहायड्रेशनचे लक्षण असते.

मुलांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे. याची खात्री करणे हे त्यांच्या एकूण आरोग्यासाठी गरजेचे आहे. मुलांचा विचार केल्यास, त्यांनी किती पाणी प्यावे याविषयी कोणतीही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. लहान वयोगटातील मुलांना नियमित 2 ते 3 तासांच्या अंतराने दिवसभर पाणी पिण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. कोरडे ओठ, लघवीचा रंग गडद होणे किंवा मुलांमध्ये चिडचिडेपणा यासारख्या निर्जलीकरणाच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे आणि आवश्यकतेनुसार त्यांना अधिक पाणी पिण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर हायड्रेशनच्या चांगल्या सवयी लावून, मुलांना भरपूर पाणी पिण्याची सवय लावावी. मुलाने पुरेसे पाणी पिल्याची खात्री करावी.

वयोगटानुसार वर्गीकरण :

1-3 वयोगटातील मुलांनी दररोज सुमारे 5 कप पाणी प्यावे 4-9 वयोगटातील मुलांनी सुमारे 6 कप पाणी प्यावे. 10-15 वयोगटातील मुलांसाठी किमान 8 कप पाणी प्यावे. 15-18 वयोगटातील किशोरांनी दररोज किमान 12 कप पाणी प्यावे.
पालकांनी मुलांना रंगीबेरंगी आणि आकर्षक पाण्याच्या बाटल्या खरेदी करून द्याव्यात, ज्या मुलांना पाणी पिण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात आणि ते सहज वापरू शकतात. त्यांच्या आहारात टरबूज आणि काकडीसारख्या फळांचा समावेश करावा.

त्वचेची सुरक्षा

1. बाळांना थेट सूर्यापासून दूर ठेवा आणि खूप उष्णता असताना ही मुलांना (सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान) सूर्याच्या अतिनील किरणांपासून दूर ठेवा .
2. टोपी आणि सनग्लासेस या संरक्षण पर्यायांचा वापर करा .
3. बाहेर जाण्यापूर्वी 15-20 मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावा आणि मुले पाण्यात गेल्यानंतर पुन्हा लावा.
4. बाळाला विविध माध्यमातून द्रव पदार्थ किंवा आईचे दूध द्यावे.

Back to top button