ठाणे: एक कोटींचे दागिने चोरणाऱ्या सेल्समनला अटक | पुढारी

ठाणे: एक कोटींचे दागिने चोरणाऱ्या सेल्समनला अटक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या सेल्समनने 1 कोटी 5 लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी सेल्समन राहुल जयंतीलाल मेहता यास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून 62 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डॉ. मुस रोडवरील राजवंत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात सेल्समन असलेला राहुल जयंतीलाल मेहता हा 25 मार्च रोजी दुकानातील 1 कोटी 5 लाखाचे दागिने घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी दुकानाचे मालक सुरेश पारसमल जैन (वय 59) यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचे समोर आले. तर त्याची पत्नीने नौपड्यात पोलिसात 15 मार्च रोजी त्याच्या मिसिंगची तक्रार दाखल केल्याचे देखील समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता आरोपी मीरा रोड, मुंबई, इंदौर, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे आढळून आले.

दरम्यान, 26 मार्च रोजी आरोपी त्याच्या मैत्रीला भेण्यास मीरा रोड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्यास सापळा लावून मीरा रोड परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून अपहार केलेल्या दागिन्यांपैकी 62 लाख 10 हजाराचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपी राहुल जयंतीलाल मेहता यास दारू पिण्याचे तसेच मौजमाजा करण्याचे व्यसन आहे. त्यासाठी तो काम करत असलेल्या ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी करायचा व ते दागिने विक्री करून त्या मिळणाऱ्या पैशात मौजमजा करायचा.

परंतु, ही छोटी चोरी कुणाच्याही लक्षात आली नाही. त्यानंतर त्याने मोठी चोरी करायची व परराज्यात जाऊन स्थायिक व्हायचे असा प्लॅन आखला होता. संधी मिळताच त्याने दुकानातील 1 कोटी 5 लाखाचे दागिन्यांचा अपहार करून पळ काढला. तो मीरा रोड, मुंबई, इंदौर, गुजरात आदी ठिकाणी फिरून चोरलेल्या पैशांवर मौजमजा करीत होता. तो मीरा रोड येथे राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असताना अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.

हेही वाचा 

Back to top button