Lok Sabha elections 2024 : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात जागा वाटपाचा तिढा | पुढारी

Lok Sabha elections 2024 : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात जागा वाटपाचा तिढा

ठाणे : दिलीप शिंदे : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections 2024) बिगुल वाजले असताना अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटलेला नाही. कल्याणात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भिवंडीत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. मात्र ठाण्याची जागा कोण लढविणार? यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असताना भाजप उमेदवाराला शिवसनेच्या चिन्हावर लढविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. तर महाविकास आघाडीचा कल्याणमधील उमेदवाराचा शोध अद्याप संपला नसून भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा वाढला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्यानंतर ठाणे जिल्ह्याला राज्याच्या राजकारणात विशेष महत्व आले आहे. १८ आमदार आणि ३ लोकसभा मतदार संघ असलेल्या जिल्ह्याचे नेतृत्व नेहमीच शिवसेना-भाजप युतीकडे राहिलेले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख असल्याने या तिन्ही मतदारसंघावर साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ६५ लाख मतदार संख्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याणवर शिवसेनेचा भगवा फडकत राहिलेला असून भिवंडीत भाजपचे कमळ फुलत असते. ओबीसी समाजाचे असलेले खासदार कपिल पाटील यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन शिवसेनेला शह देण्याचे प्रयन्त केले. त्यातून महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद वाढू लागले आणि त्याचे पर्यवसन कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळ्या धाडण्यात झाला. यातून शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद किती शिगेला पोहचला आहे, याची प्रचिती येते. (Lok Sabha elections 2024)

अशा स्फोटक राजकीय परिस्थितीमध्ये जागा वाटपाचा तिढा वाढीस लागला. कुणाची ताकद अधिक आहे, याची आकडेवारीसह भाजपने दावा ठोकल्याने फुटीमुळे कमजोर झालेल्या शिंदे गटाची कोंडी झाली. कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देताना ठाण्यात भाजपचा उमेदवार हवा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यात भाजपच्या तुलनेत शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याचा दावा केला गेला. दुसरीकडे धर्मवीर आनंद दिघे यांनी हट्टाने भाजपकडून खेचून घेतलेला मतदार संघ पुन्हा भाजपला दिल्यास विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळेल. ठाकरे गटाकडून दिघे यांचे दुसरे शिष्य राजन विचारे हे तिसऱ्यांदा लढत असल्याने शिंदे गटातील शिवसैनिकही त्यांना मदत करू शकतात, अशी भीती महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक हे लढण्यास तयार आहेत. पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपकडून जीवाचे रान केले जाणार असल्याने विजयाची खात्री शिंदे गटाला वाटत आहे. ठाणेदारी सोडण्याऐवजी भाजपचा उमेदवार आयात करून धनुष्यबाणावर लढविण्याचा प्रस्तावही भाजपला देण्यात आला. त्याकरिता माजी खासदार संजीव नाईक यांना विचारणा झाल्याचे समजते. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील मधुर संबंध आडवे येत असल्याचे बोलले जाते.

कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महायुतीत सामील होण्याची चर्चा सुरु झाल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडीला तोडीस तोड असा स्थानिक उमेदवार सापडेना. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी अचानक लोकसभा लढविण्यास नकार दिल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि युवा नेते वरून सरदेसाई यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करीत खासदार शिंदे यांनी कल्याणची दोनदा सुभेदारी राखली आहे. २००९ मध्ये माजी खासदार आनंद परांजपे यांनी कल्याणची सुभेदारी राखली होती. मात्र शिवसेनेंतर्गत वादातून परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले. त्यामुळे खासदार शिंदे यांना पहिल्यांदा कल्याण मतदार संघाच्या रिंगणात उतरून परांजपे यांचे बंड मोडीत काढण्यात आले. पुन्हा २०१४ मध्ये परांजपे हे ठाण्यातून लढले आणि खासदार राजन विचारे यांनी त्यांचा पुन्हा पराभव केला. तेच परांजपे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत गेल्याने शिंदेंच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे महायुतीसोबत जाणार असल्याने महायुतीचा मार्ग सुकर झाला आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाची ओळख हा कट्टर हिंदुत्व जपणारा मतदार संघ असल्याने ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या पूर्वीच्या भाषणाचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरून सरदेसाई यांच्या उमेदवारीला पसंती दिली जात असून भाजपमधील नाराजीचा फायदा उठविण्याच्या रणनीतीवर महाविकास आघाडीकडून काम सुरु आहे.

भिवंडी लोकसभेचे भाजप उमेदवार केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील हे प्रचाराला लागले आहेत. तर भिवंडीची जागा कुणाला सोडायची यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे. पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ असलेल्या भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाचे वजनदार नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी देण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. त्यामुळे तिढा वाढला आहे. ही जागा काँग्रेस सोडण्यास तयार नसून त्यांनी निलेश सांबरे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची रणनीती आखली आहे. तसे न झाल्यास निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील आणि भिवंडीतील लढत तिरंगी होऊ शकते.

हेही वाचा : 

Back to top button