शिवसेनेची पहिली यादी; ठाणे, कल्याण वेटिंगवर; सात विद्यमान खासदारांना तिकिटे | पुढारी

शिवसेनेची पहिली यादी; ठाणे, कल्याण वेटिंगवर; सात विद्यमान खासदारांना तिकिटे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली आठ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत सात विद्यमान खासदारांना तिकिटे देण्यात आली आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह विद्यमान खासदार हेमंत गोडसे, भावना गवळी आणि राजेंद्र गावित या चार खासदारांच्या नावांची घोषणा लांबली आहे.

 संबंधित बातम्या

ठाणे आणि कल्याण मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. तेथील उमेदवारांचा मात्र पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, कल्याणचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे असताना त्यांच्याही नावाची घोषणा रखडली आहे. कल्याण आणि ठाण्यापैकी एका मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे या यादीवरून स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांमध्ये निर्माण झालेली लढत पाहता विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर होते की नाही, याबाबत शंका घेतली जात होती. मात्र, शिंदे यांनी दोघांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगणार आहे, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी अशी लढत पुन्हा होणार आहे.

सेनेची पहिली यादी

मावळ : श्रीरंग बारणे
हिंगोली : हेमंत पाटील
हातकणंगले : धैर्यशील माने
कोल्हापूर : संजय मंडलिक
बुलडाणा : प्रतापराव जाधव
रामटेक : राजू पारवे
शिर्डी : सदाशिव लोखंडे
दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे

ठाणे आणि कल्याणपैकी एक मतदारसंघ भाजप मागत असल्यानेच श्रीकांत शिंदे यांची घोषणा झालेली नाही. शिवाय, संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ-वाशिम, नाशिक या मतदारसंघांवरूनही महायुतीत पेच असल्याचे या यादीवरून स्पष्ट होते. त्यामुळेच ज्या जागांवर एकमत झाले आहे अशा आठ जागांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली. या यादीत सात विद्यमान खासदारांना पुन्हा तिकिटे देण्यात आली आहेत.

Back to top button