मतांसाठी भाजप अन् कामांसाठी काँग्रेस असे यापुढे चालणार नाही, मंडलिक यांना खडे बोल | पुढारी

मतांसाठी भाजप अन् कामांसाठी काँग्रेस असे यापुढे चालणार नाही, मंडलिक यांना खडे बोल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आम्ही रक्ताचे पाणी करून तुम्हाला निवडून आणले; पण तुम्ही गेल्या पाच वर्षांत भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांची कामे केली नाहीत. मते द्यायला आम्ही आणि तुम्ही काँग्रेसवाल्यांची कामे केली. यापुढे असे चालणार नाही, असा दम भाजप कार्यकर्त्यांनी खा. संजय मंडलिक यांना दिला. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह इतरांनी खा. मंडलिक यांना खडे बोल सुनावले. अनपेक्षित झालेल्या टीकेमुळे खा. मंडलिकसुद्धा क्षणभर बेचैन झाले.

उघड बोललो याचा अर्थ विरोध नाही

महायुतीअंतर्गत शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर खा. मंडलिक यांनी शुक्रवारी भाजपच्या कार्यालयात जाऊन पदाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या मेळाव्यात पदाधिकार्‍यांनी खा. मंडलिक यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत चांगलेच सुनावले. त्यानंतर स्वागत करून पाठिंबा व्यक्त केला. खा. धनंजय महाडिक, समरजित घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह इतर उपस्थित होते. आम्हाला जे वाटते ते उघड बोललो याचा अर्थ आम्ही नाराज आहोत आणि विरोध करणार असा नाही, असेही पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या नेत्यांचे गुणगान बंद करा

जाधव म्हणाले, गेल्या निवडणुकीत आम्ही त्यांचा प्रचार केला होता. पाच वर्षांत त्यांनी कसलाही संपर्क ठेवला नाही. आमची कामे केली नाहीत. विकासकामांना निधी दिला नाही. त्यामुळे पुन्हा आम्ही त्यांना निवडून आणून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करायचे, हे चालणार नाही. आता यापुढे काँग्रेसच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे, गुणगान करणे बंद केले पाहिजे. भाजपचे कार्यकर्ते हे खपवून घेणार नाहीत. त्याबरोबरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आपली जुनी मैत्री विसरली पाहिजे. यासाठी खा. महाडिक यांनी त्यांना सांगावे, असे सांगून जाधव म्हणाले, जिल्हा बँक, गोकुळ, महापालिका यासाठी त्यांच्यासोबत आणि आम्हाला विरोध हे चालणार नाही. भाजपची सत्ता असताना जिल्ह्यात भाजपच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोन्याचे दिवस आले पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

यावेळी खा. मंडलिक यांनी भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीकडे गेलो. त्यामुळे आपल्यात अंतर पडल्याची खंत व्यक्त केली. तसेच यापुढे योग्य ती दक्षता घेऊन कायमपणे भाजपच्या संपर्कात राहून कामे केली जातील, अशी ग्वाही दिली.

मंडलिकांना मत म्हणजे मोदींना मत

कोल्हापूर किंवा हातकणंगले मतदारसंघापैकी एक मिळावा अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलवायचे, अशी आमची इच्छा आहे; पण भाजपकडे मतदारसंघ आला नाही. भाजपचे दहा हजार कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रचार करून लाखोच्या फरकाने मंडलिक यांना निवडून आणणार, यात शंका नाही. मंडलिकांना मत म्हणजे मोदींना मत हे आमचे लक्ष्य आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यापेक्षा दोन पावले पुढे जाऊन भापचे कार्यकर्ते प्रचार करतील, असेही जाधव यांनी सांगितले.

Back to top button