सावधान ! आक्षेपार्ह पोस्ट पडतील महागात; प्रशासनाचा मोठा निर्णय | पुढारी

सावधान ! आक्षेपार्ह पोस्ट पडतील महागात; प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे : सोशल मीडियाचा सकारात्मक कामासाठी वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात. या माध्यमातून अनेकांनी चांगल्या समाजनिर्मितीसाठी हातभार लावला आहे. एखादी समस्या यावरून सहज सोडविता येते. असे असले तरी काही समाजकंटक याचा नकारात्मक पद्धतीने वापर करतात. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा फेक न्यूजच्या माध्यमातून पसरविली जाण्याची शक्यता आहे. तसे केल्यास ते चांगलेच महागात पडू शकते.

निवडणुकीच्या काळात विशेष लक्ष ठेवण्याकरिता सायबर पोलिस ठाण्यातील पथक निवडणूक काळात अधिक सक्रिय झाले आहे. सोशल मीडियावरच्या व्हायरल होणार्‍या पोस्ट, न्यूज यावर त्यांचा वॉच आहे. बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून मिळाले आहेत. प्रत्येकाने जबाबदारीने वागत यापासून दूर राहणेच हितावह राहणार आहे. पोलिसांनी कारवाईसाठी यंत्रणा सज्ज केलेली आहे. फेक न्यूजसंदर्भात तक्रार कोठे कराल? संबंधित पोलिस ठाण्यातही दाद मागता येते. थेट सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची सुविधा आहे.

फेक आयडी बनविला तरीही होते अटक

सोशल मीडियावर बर्‍याचदा स्वतःची ओळख लपवून फेक आयडीचा वापर केला जातो. या माध्यमातून फेक न्यूज व पोस्ट पसरविल्या जातात. वर्षभरात सोशल मीडियावरून फेक न्यूज व बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याच्या सायबर सेलकडे शंभरावर तक्रारी आल्या आहेत. यामध्ये संबंधितांवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे.

समाजात द्वेष निर्माण करणे, कोणा एकाची बदनामी करणे, शांतता भंग होईल अशा न्यूज व्हायरल करणे, अशांवर पोलिसांचा वॉच असून, त्याविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. याकरिता शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर कमिटी नेमण्यात आली आहे.

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांचे तुमच्या सोशल मीडियावर पूर्णपणे लक्ष आहे. कोणतीही माहिती पुढे पाठविताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही आक्षेपार्ह माहिती फॉरवड केली, तर शिक्षेस पात्र ठरू शकता. निवडणूक आयोगाचे याबाबत कडक धोरण राहणार आहे. निवडणुकीचा काळ असल्याने प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

– पंकज देशमुख, ग्रामीण पोलिस अधीक्षक

हेही वाचा

Back to top button