Loksabha election | आम्हाला साथ द्या ! अनंतराव थोपटेंना शिवतारेंची साद | पुढारी

Loksabha election | आम्हाला साथ द्या ! अनंतराव थोपटेंना शिवतारेंची साद

भोर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी (दि. 20) माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत शरद पवारांचे नाव न घेता जुन्या गोष्टी विसरू नका, बदला घ्यायची हीच वेळ आहे. आता आम्हाला साथ द्या, अशी साद घातली आहे. या वेळी शिवसेना भोर शहराध्यक्ष नितीन सोनावले, दशरथ जाधव, दिलीप यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी 40 वर्षांचे राजकीय वैर बाजूला ठेवून अनंतराव थोपटे यांची संगमनेर-माळवाडी (ता. भोर) येथे भेट घेतली होती. त्यानंतर कापूरव्होळ (ता. भोर) येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना साथ देऊ, असे सांगितले होते.

आमदार संग्राम थोपटे यांना मंत्री होऊ दिले नाही, विधानसभा अध्यक्ष होऊ दिले नाही. 1999 मधील पराभवाने अनंतराव थोपटे यांची मुख्यमंत्रिपदाची संधी घालवली. या सर्वच गोष्टींची आठवण शिवतारे यांनी पवारांचे नाव न घेता अनंतराव थोपटे यांना भेटीदरम्यान करून दिल्याचे समजते. या वेळी थोपटे म्हणाले की, आमचा आशीर्वाद आहे. राज्याच्या राजकारणात शरद पवार आम्ही एकत्र असताना माझे शेवटपर्यंत विरोधक होते. 1999 चा पराभव कसा झाला, तो कोणी केला, हे सर्वांना माहीत आहे. आगामी निवडणुकीच्या वेळी आम्ही विचार करतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट झाले. परंतु, काँग्रेस बदलली नाही. आम्ही शेवटपर्यंत काँग्रेसबरोबर आहोत, असे प्रत्युत्तर माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी वेळी दिले.

हेही वाचा

Back to top button