लोकसभा निवडणूक : राजधानी मुंबईत चुरशीचे सामने | पुढारी

लोकसभा निवडणूक : राजधानी मुंबईत चुरशीचे सामने

संजय कदम

मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे येथील लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणारच. मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ. अर्थातच विधानसभेचे 36 मतदारसंघ. 36 मधील 26 उपनगर जिल्ह्यात आणि फक्त दहा मतदारसंघ मुंबई शहरात. मुंबईच्या निवडणुकीने भल्याभल्यांचे राजकीय करिअर घडवले तर काहींचे संपवलेही.

फाटाफुटीच्या राजकारणात यावेळची निवडणूक मोठी अटीतटीची होणार यात वाद नाही. सर्वच पक्षांमध्ये अजून उमेदवारीचा घोळ सुरू आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत धक्कातंत्राच वापर करत आपले दोन हमखास निवडून येणारे उमेदवार बदलले. त्यातून आलेली नाराजी लपून राहिलेली नाही. सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर येथील चित्र स्पष्ट होईलच. पण मुंबईची निवडणूक कोणत्याही पक्षाला किंवा युती-आघाडीला म्हणावी तेवढी सहजसोपी राहिलेली नाही, हे निश्चित.

मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार निवडीवरून घोळ सुरूच आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अद्यापपर्यंत एकाही मतदारसंघात अधिकृतरीत्या उमेदवार घोषित केलेला नाही. नाही म्हणायला ठाकरे गटाने दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तीकर आणि दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांना ‘कामाला लागा’ असे संकेत दिले आहेत. मात्र अन्य तीन लोकसभा मतदारसंघांत अजूनही एकमत झालेले नाही. आता आपण मतदारसंघनिहाय तेथील स्थिती जाणून घेऊ.

दक्षिण मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले होते. मात्र या लोकसभा मतदारसंघातून विद्यमान मंत्री मंगलप्रभात लोढा उत्सुक आहेत. हा मतदारसंघ मुळात शिवसेनेचा असल्यामुळे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दावा केला आहे. शिंदे गटाचे नेते माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. आघाडीने मात्र अद्यापपर्यंत या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नसला तरी विद्यमान खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे.

दक्षिण मध्य मुंबई

शिवसेना-भाजप महायुतीने हा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडला असून येथून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण शेवाळे यांच्यावर शिवसैनिक नाराज असल्यामुळे त्यांना ही निवडणूक जिंकणे सोपे नाही. आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथून ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर पूर्व मुंबई

या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी न देता मुलुंड विधानसभेतील विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोटक यांच्यावर मुंबई भाजपमधील एक बडा नेता नाराज असल्यामुळे त्यांचा पत्ता कट करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी कोटक यांची समजूत काढल्याने तूर्तास मामला शांत झाला आहे. कोटेचा यांच्या विरोधात ठाकरे गटाने माजी खासदार संजय दिना पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकेल.

उत्तर मध्य मुंबई

हा मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे येथून पुन्हा विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी द्यावी की नाही यावरून भाजपमध्ये मतभेद आहेत. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला गेला तर, माजी खासदार प्रिया दत्त निवडणूक लढू शकतात. आघाडीमध्येही नेमका मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाही. पूनम महाजन यांच्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीमुळे येथून भाजप नवीन उमेदवार देण्याची शक्यता आहे.

उत्तर मुंबई

या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शेट्टी गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपच्या या निर्णयाच्या विरोधात नाराज कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजीही केली. हा मतदारसंघ सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे येथून उमेदवारी कोणाला द्यायची यावरून काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. माजी खासदार संजय निरुपम यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐनवेळी बाहेरील उमेदवार आणण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये येथून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.

उत्तर पश्चिम मुंबई

हा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मागील दोन निवडणुकीत येथून ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते व सध्या शिंदे गटात सामील झालेले गजानन कीर्तीकर निवडून आले होते. यावेळी ठाकरे गटाने कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे कीर्तीकर स्वतः निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नाहीत. हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी त्यांच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Back to top button