Lok Sabha Election Goa : गोव्यात तिरंगी लढतीची चिन्हे! | पुढारी

Lok Sabha Election Goa : गोव्यात तिरंगी लढतीची चिन्हे!

x

गोवा वार्तापत्र : किशोर शांताराम शेट मांद्रेकर

गोव्यात यावेळी भाजप, काँग्रेस आणि आरजीपी अशा तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. भाजपने उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. ते आजपर्यंत अपराजित आहेत. आरजीपीतर्फे अध्यक्ष मनोज परब हे रिंगणात उतरले आहेत. उत्तर गोव्यात 20 मतदारसंघ असून, त्यातील फक्त हळदोणा या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. उर्वरित 19 पैकी 18 आमदार भाजपचे व अपक्षासह एक मगो अशा दोन आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोव्यात 11 आमदार निवडून आले होते. वर्षभरापूर्वी त्यातील तब्बल 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसकडे उत्तरेत एक व दक्षिणेत दोन आमदार आहेत. (Lok Sabha Election Goa)

उत्तर गोव्यामध्ये भंडारी समाजाची संख्या जास्त आहे. श्रीपाद नाईक हे त्याच समाजाचे नेते आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने भंडारी समाजाचे नेते रवी नाईक यांना 2014 साली व 2019 मध्ये गिरीश चोडणकर यांना उमेदवारी देऊन पाहिली; पण श्रीपाद यांनी रवी यांचा 1,05,099 मतांनी व चोडणकर यांचा 79,627 मतांनी पराभव केला. काँग्रेस पक्षातर्फे उत्तरेतून माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप आणि काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके ही दोन नावे चर्चेत आहेत. आरजीपीचे उत्तर गोवा उमेदवार मनोज परब त्यासाठी स्थानिक विषय घेऊन लोकांसमोर जाताना दिसत आहेत. आरजीपीचा एकमेव आमदार उत्तर गोव्यातील सांत आंद्रेतून निवडून आलेला आहे. (Lok Sabha Election Goa)

दक्षिणेत ख्रिस्तीबहुल असलेल्या सासष्टी तालुक्यातील चार मतदारसंघ पहिल्यांदाच भाजपबरोबर आहेत. मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मगोचा पाठिंबाही भाजपला आहे. दोन्ही जागा शंभर टक्के जिंकणार, असा दावा करणार्‍या भाजपने दक्षिणेत पुरुष की महिला उमेदवार, असा गोंधळ निर्माण करून मतदारांना संभ्रमात टाकले आहे. गेल्यावेळी पावणेदहा हजारांच्या फरकाने पराभूत झालेले नरेंद्र सावईकर यांच्याकडे 2024 चे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात होते; पण 2012 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बाबू कवळेकरांना पक्षातील काही नेत्यांनी उमेदवारीचे गाजर दाखवल्यामुळे त्यांनीही कामाला सुरुवात केली आहे. (Lok Sabha Election Goa)

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांचे नावही उमेदवारीसाठी चर्चेत आहे. बांधकाम खाते काढून घेतल्यानंतर काही काळ ते पक्षावर नाराज होते; पण त्यांच्या मतदारसंघातील अपूर्ण कामे पूर्णत्वास नेऊन त्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना यश आले आहे. काँग्रेसची सांगेबरोबर कुडचडेतही सुमारे पाच हजार पारंपरिक मते आहेत, ज्यात ख्रिस्ती मतांचा अधिक समावेश आहे. गेल्यावेळी फ्रान्सिस सार्दिन यांच्या विजयात त्या मतांचा वाटा लक्षणीय होता. या मतदारसंघातून आरजी पक्षाने रूबर्ट परेरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपला सासष्टीत कधीच पाय रोवता आले नव्हते. यंदा मात्र आपमुळे काँग्रेसच्या या तालुक्याला खिंडार पडले आहे.

नावेलीव्यतिरिक्त मडगाव आणि नुवेचे आमदारही भाजपला मिळाले आहेत. कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड भाजपला सहकार्य करणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीमुळे काँग्रेसला सासष्टीतील आपचे बाणावली आणि वेळ्ळी या दोन आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी विद्यमान खासदार सार्दिनना उमेदवारी दिल्यास काँग्रेसला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेससमोरही पेच आहे.

हे ही वाचा:

 

 

Back to top button