Lok Sabha Karnataka Election 2024: कर्नाटकात भाजपकडे जागा राखण्याचे आव्हान; बेळगाव आणि चिकोडी मतदारसंघांत ‘हायव्होल्टेज’ लढती | पुढारी

Lok Sabha Karnataka Election 2024: कर्नाटकात भाजपकडे जागा राखण्याचे आव्हान; बेळगाव आणि चिकोडी मतदारसंघांत ‘हायव्होल्टेज’ लढती

गोपाळ गावडा: पुढारी वृत्तसेवा:

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने तोलून-मापून उमेदवारांची निवड चालवली आहे. 2014 आणि नंतर 2019 च्या निवडणुकीतही मोदींची लाट कायम होती. यंदाही कर्नाटकात मोदी लाट असली, तरी काँग्रेसने पंचहमी योजना जारी करून लोकांची मने जिंकली आहेत. त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रीयस्तरावरही करत आहे. तरीही भाजपला सर्वाधिक जागा मिळतील यात शंका नाही; पण काँग्रेसच्या कर्नाटकातील जागा वाढण्याचा अंदाज आहे. (Lok Sabha Karnataka Election 2024)

गत निवडणुकीत एकूण 28 जागांपैकी भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि निजद प्रत्येकी 1 व अपक्ष 1 असा एकतर्फी निकाल लागला होता. यंदा भाजपने देवेगौडांच्या निजदशी युती केल्याने बहुतेक ठिकाणी दुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. भाजपने पहिल्या टप्प्यात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात बेळगावचा समावेश नाही. कारण, बेळगावमधून कुणाला उभे करायचे, हे कोडे अद्याप सुटलेले नाही. कारवार, रायचूर, मंड्या, हासन, चित्रदुर्ग, कोलार आणि चिक्कबळ्ळापूर या मतदारसंघांचेही उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. काँग्रेसनेही पहिल्या यादीत सात उमेदवारांची घोषणा केली आहे. (Lok Sabha Karnataka Election 2024)

बेळगावात सुरेश अंगडी असताना उमेदवाराची अडचण भाजपला नव्हती. रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी अनेक योजना राबवल्या, लोकप्रियताही मिळवली. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली. सहानुभूतीचा लाट असूनही भाजपचे इथले मताधिक्क्य 75 हजारांवरून चार हजारांपर्यंत घसरले. त्यामुळे मंगल अंगडी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही. म्हणूनच इथून जगदीश शेट्टर यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत; पण त्याला स्थानिक भाजप नेत्यांकडून विरोध होत आहे. शेट्टर हे मूळचे धारवाड जिल्ह्यातील असल्याने, आयात उमेदवार नको, अशी बेळगावच्या नेत्यांची मागणी आहे. (Lok Sabha Karnataka Election 2024)

काँग्रेसचेही तेच आहे. गतवेळी सतीश जारकीहोळी यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. आता मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तसे झाल्यास या दोन्ही मतदारसंघांमध्ये ‘हायव्होल्टेज’ लढती पाहायला मिळतील. चिकोडीतून भाजपतर्फे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्लेंना उमेदवारी जाहीर झाली आहे; तर काँग्रेसकडून प्रियांका जारकीहोळींना उमेदवारी देण्यात येणार आहे. तसे झाल्यास ही लढतही चुरशीची होईल, अशी चिन्हे आहेत. प्रियांका या पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या. ते आपल्या मुलीसाठी काहीही कसर बाकी सोडतील, असे वाटत नाही. (Lok Sabha Karnataka Election 2024)

हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, माजी मंत्री ईश्वरप्पा यांनी आपल्या मुलासाठी इथून उमेदवारीची मागणी केली होती. ती न मिळाल्यामुळे आता ते बंडाच्या भूमिकेत आहेत. दावणगिरीमध्येही जी. एम. सिद्धेश्वर यांच्या पत्नी गायत्री यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री रेणुकाचार्य येथून इच्छुक होते. तेही नाराज असून, येथेही बंडाची शक्यता आहे.
उडुपी-चिक्कमंगळूरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारींना भाजपने उमेदवारी दिली आहे. येथून भाजप सोडून काँग्रेस प्रवेश करणारे जयप्रकाश हेगडे काँग्रेसतर्फे रिंगणार असणार आहेत. येथेही अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

म्हैसूरचे राजे रिंगणात

कोल्हापुरात शाहू महाराज रिंगणात उतरणार हे निश्चित आहे; पण कर्नाटकात राजघराण्याचे वारस रिंगणात उतरलेच आहेेत. म्हैसूरमधून यदुवीर वडेयर हे वडेयर घराण्याचे वंशज भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. यदुवीर यांची ही पहिलीच निवडणूक असली, तरी हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ ठरणार आहे. बंगळूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे विद्यमान आणि एकमेव खासदार डी. के. सुरेश यांच्याविरुद्ध प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मंजुनाथ रिंगणात असतील. शिमोग्यातून विद्यमान भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या गीता शिवराजकुमार रिंगणात असणार आहेत. गीता या अभिनेते शिवराजकुमार यांच्या पत्नी. त्यामुळे ही

लढतही प्रतिष्ठेची ठरणार आहे.

पी. सी. गद्दिगौडर (बागलकोट), रमेश जिगजिणगी (विजापूर), डॉ. उमेश जाधव (गुलबर्गा), भगवंत खुबा (बिदर), प्रल्हाद जोशी (धारवाड) यांचे मतदारसंघांत प्राबल्य आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील या मतदारसंघांतून काँग्रेस कुणाला उमेदवारी देते, यावर लढती चुरशीच्या होतील की एकतर्फी हे ठरेल.

हे ही वाचा:

Back to top button