मोठी बातमी | रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे सामना होणार नाही, एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं… | पुढारी

मोठी बातमी | रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे सामना होणार नाही, एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं...

पुढारी ऑनलाइन डेस्क– रावेर लोकसभा मतदार सघांत भाजपच्या उमेदवार म्हणून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यात सामना रंगेल अशा स्वरुपाच्या चर्चा कालपर्यंत होत्या. मात्र रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे सामना होणार नसल्याचे खुद्द एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रावेर लोकसभेच्या निवडणूकीत नणंद व भावजयी विरोधातील सामना आता होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खडसे म्हणाले, मी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढू शकत नाही आणि रोहिणी खडसेही विधानसभेच्या दृष्टीनेच तयारी करत आल्या आहेत. त्यामुळे त्याही ही निवडणूक लढवणार नाही. असे स्पष्टपणे खडसे यांनी पत्रकारपरिषद घेऊन सांगितले आहे. दरम्यान रावेरची जागा राष्ट्रवादीतकडेच राहणार आहे. आठ ते दहा उमेदवार इच्छुक आहे. त्यांसदर्भात पवार साहेबांसोबत बैठक झाली आहे. उद्या काय ते स्पष्ट होईल असे खडसे म्हणाले.

रावेर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपच्या दुसऱ्या यादीत या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीमध्ये आहेत. तर त्यांची सून म्हणजेच रक्षा खडसे भाजपत आहेत. रक्षा खडसे २०१९ च्या निवडणुकीतही चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. त्यामुळे दोघांना परस्पर विरोधी निवडणूक लढवावी लागली असती तर एकनाथ खडसे यांची फार कोंडी झाली असती. मात्र तसे काही होणार नसल्याचे खडसे यांनीच स्पष्ट केल्याने सगळ्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. दरम्यान रोहिणी खडसे या मुक्ताईनगरमधून विधानसभा लढविण्यास इच्छुक आहेत.

Back to top button