Leopard News : उंब्रजला बिबट्या जेरबंद ! | पुढारी

Leopard News : उंब्रजला बिबट्या जेरबंद !

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील उंब्रज या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने १० पिंजरे लावले असून शुक्रवारी (दि. १५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या ८ वर्षांची मादी असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. उंब्रज येथील चार वर्षाच्या आयुष शिंदे या बालकावर चार दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. आयुषच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले आहे. आता त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. सतिश डेरे यांनी सांगितले.

दरम्यान उंब्रज या ठिकाणी आयुष शिंदे यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी १० पिंजरे व १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दोन टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. रेस्क्यू टीमचे लोकही उंब्रज परिसरामध्ये तळ ठोकून आहेत. दरम्यान वन विभागाने शुक्रवारी पकडलेला बिबट्या हा आयुष शिंदे या बालकावर हल्ला करणारा आहे किंवा कसे? याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. वन विभागाने ज्या ठिकाणी बिबट्याने आयुषवर हल्ला केला त्या ठिकाणच्या बिबट्याच्या पाऊल खुणाचे ठसे प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतलेले आहेत. माणिकडोह निवारात दाखल करण्याला बिबट्याच्या पंजाचे देखील ठसे घेतले जाणारे असून दोन्ही ठसे मॅच होतात किंवा कसे यावरून आयुषवर हल्ला करणारा हाच तो बिबट्या आहे का याबाबतचा उलगडा होऊ शकेल, असे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

दरम्यान उंब्रज परिसरामध्ये अद्यापही ९ ते १० बिबटे असावेत,असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिक करीत आहेत. उंब्रज परिसरामध्ये आयुष शिंदे या बालकावर हल्ला करणारा बिबट्या जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत वनविभागाची सगळी यंत्रणा याच ठिकाणी ठेवली जाणार असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परिसरामध्ये बिबट्या संदर्भात काही उपद्रव आढळल्यास वनविभागाच्या स्थानिक कार्यालयाशी अथवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा जुन्नर येथील वनविभागाच्या कार्यालयाची संपर्क साधून याबाबतची तातडीने माहिती द्यावी असे आवाहन देखील सातपुते यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button