राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये काँग्रेस मग्न असतानाच भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून टाकली. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचा दौरा सुरूच ठेवला असून, हजारो कोटी रुपयांच्या शेकडो प्रकल्पांच्या उद्घाटनांचा त्यांनी धडाका लावला आहे. गेल्या 29 फेब—ुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभेसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी निश्चित झाली आणि 2 मार्च रोजी ती जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत मोदी, त्याचप्रमाणे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आणि 34 केंद्रीय राज्यमंत्र्यांची नावे समाविष्ट होती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विदिशामधून तिकीट देऊन त्यांच्या नावावर काट मारण्यात येणार आहे, अशा गप्पांना विराम देण्यात आला.
विशेष म्हणजे, लखीमपूर खेरीमधून वादग्रस्त खासदार अजय मिश्रा टेनी, तसेच उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी जाहीर केली गेली. टेनी यांच्या मुलाने काही शेतकर्यांना जीपखाली चिरडले, असा आरोप होता आणि खुद्द टेनी यांनीही वार्ताहरांना धमकावल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. साक्षी महाराज यांनी धार्मिक द्वेष पसरवणारी वक्तव्ये केल्याचा आरोप होता. खरे तर, या दोघांना घरी पाठवण्यात येईल, असे वाटत होते; परंतु तसे घडले मात्र नाही. आता दहा राज्यांतील 72 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश आहे. त्यातील ठळक नाव आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. गडकरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून पायाभूत क्षेत्र आणि रस्ते विकासात नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षही त्यांचे नेहमीच कौतुक करतात. अशावेळी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या विरोधात आहेत आणि म्हणून त्यांचा पत्ता साफ केला जाईल, अशा कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या. एरव्ही अधूनमधून आपली नाराजी प्रकट करणार्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देत त्यांची अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. बहिणीच्या जागी मला उमेदवारी नको आहे आणि महायुतीमुळे धनंजय मुंडे यांना तेथील विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. पर्यायाने मला आता मतदारसंघच उरलेला नाही, अशा आशयाचे उद्गार पंकजा यांनी काढले होते. मला लोकसभेची उमेदवारी मिळू नये, अशी मीच प्रार्थना करत आहे, अशी भावना व्यक्त करणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली.
प्रतिष्ठित अशा पुणे मतदारसंघातून उभे राहण्यासाठी भाजपचे सरचिटणीस सुनील देवधर, माजी शहरप्रमुख जगदीश मुळीक आणि माजी राज्यसभा खासदार संजय काकडे इच्छुक होते. परंतु, पुण्याचे महापौर राहिलेले मुरलीधर मोहोळ उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले. गेल्या वर्षी कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांना उमेदवारी दिली गेली; पण त्यांचा पराभव झाला. म्हणून यावेळी मतपेढी सांभाळण्यासाठी देवधर यांना तिकीट दिले जाईल, असे मानले जात होते. 2019 मध्ये पुण्यातून गिरीश बापट हे निवडून आले होते; परंतु मोहोळ हे कार्यकर्तृत्वामुळे पुण्यात लोकप्रिय आहेत.
उत्तर मुंबई मतदारसंघातून गेल्यावेळी देशात दुसर्या क्रमांकाच्या मताधिक्याने गोपाळ शेट्टी निवडून आले होते; परंतु त्यांना डावलले असून, तेथून पीयूष गोयल यांना रिंगणात उतरवले आहे. साहजिकच शेट्टी नाराज झाल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या भेटीस जावे लागले; परंतु शेट्टी हे निष्ठावंत असल्यामुळे ते समर्थकांचीही समजूत काढतील, असे सांगितले जाते. शिवाय राज्यसभेतून खासदार आणि मंत्री झालेल्या नेत्यांनीही रीतसर लोकसभेच्या मैदानात उतरून निवडून यावे, हे भाजपचे धोरण आहे. काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे 10 जनपथची सेवा करून, म्हणजेच पक्षश्रेष्ठींची मर्जी राखून राज्यसभेवर जायचे, मागच्या दाराने मंत्री व्हायचे आणि शिवाय 'राष्ट्रीय नेते' म्हणून मिरवत राहायचे ही परंपरा आहे. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक असे अनेक काँग्रेस नेते याच वाटेने मोठे झाले. परंतु, भाजपमध्ये नवी वाट निवडलेली दिसते. रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांचे सासरे एकनाथ खडसे हेदेखील पुन्हा भाजपमध्ये परततील, अशा चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील चार खासदारांना धक्का देण्यात आला, तर तीन माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेत उतरवले आहे. भाकरी फिरवून योग्य माणसांना योग्य ठिकाणी हलवायचे आणि त्यांच्या जागी नव्या लोकांना संधी द्यायची, ही रणनीती आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार, हीना गावित यांनाही पुन्हा संधी दिली गेली असून, गेली पाच वर्षे प्रतीक्षेत असलेल्या प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांना जळगावची उमेदवारी मिळाली. महाराष्ट्रातील अनेक कर्तृत्ववान महिला या यादीत दिसतात.
भाजपच्या दुसर्या यादीत देशातील एकूण 15 महिलांचा समावेश आहे. संसदेत घुसखोरी करणार्या तरुणांना पास देणार्या म्हैसूरमधील खासदार प्रताप सिंहा यांचे तिकीट रास्तपणे कापण्यात आले. सर्वसाधारणतः ज्यांची मतदारांमधील प्रतिमा आणि लोकप्रियता चांगली आहे आणि जे जिंकून येऊ शकतात, त्यांना उमेदवारी देण्याकडे भाजपचा कल आहे. ज्या राज्यांत भाजप मजबूत असूनही ज्यांचा गेल्यावेळी पराभव झाला होता, त्यांना संधी नाकारण्यात आली; परंतु तेलंगणासारख्या राज्यात ज्यांनी उत्तम लढत दिली, अशा गेल्यावेळच्या काही पराभुतांना लोकसभेत संधी देण्यात आली आहे. भाजपने दमदार उमेदवार देत पहिल्या टप्प्याची बांधणी केली आहे. पक्षापुढे मोठे आव्हान आहे ते आघाडीतील घटकपक्षांना सामावून घेत जागा वाटप करण्याचे. ते करतानाही काही कटू निर्णय घेण्याची तयारी पक्षाने ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीसमोर दमदार व्यूहरचना करून भाजप निवडणुकीतील समर्थ सत्ताधारी पक्ष म्हणून पुढे येताना दिसतो.