कोकणातील मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर | पुढारी

कोकणातील मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर

किशोर सूद

अलिबाग ः कोकण किनारपट्टीतील मिठागरे आणि पारंपरिक मीठ व्यवसाय सध्या मोठ्या अडचणीत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईपासून रायगड जिल्ह्यातील पेण, उरण ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड्यापर्यंत मीठ उत्पादन घेतले जात होते. मात्र, विकासक आणि भूमाफियांचे मिठागरांच्या जमिनीवर होणारे अतिक्रमण, वाढते जलप्रदूषण, बांधबंदिस्ती फुटून सागरी उधाणाचे पाणी मिठागरांत घुसणे, स्थानिक कामगारांची कमतरता, त्याचबरोबर इतर भागांतून येणारे मीठ आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे कोकणातील मिठागरे आणि मीठ व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेण, उरण आणि काही प्रमाणात अलिबाग या तालुक्यांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात मिठागरे होती. या मिठागरांवर झालेल्या अतिक्रमणामुळे जेमतेम 20 टक्केच मिठागरे आता शिल्लक राहिली आहेत. मिठागरे ही नैसर्गिक नसून, मानवनिर्मित आहेत. मिठागरांची जागा ही सन 1981 मध्ये बनलेल्या सीआरझेड कायद्यानुसार संरक्षित होती. परंतु, 2017 मध्ये पाणथळ जागा अधिनियमात बदल करत मानवनिर्मित पाणथळ जागा या पाणथळ जागांमधून वगळण्यात आल्या. त्यामुळे विकासकांना व भूमाफियांना मिठागरांच्या जागेवर अतिक्रमणास मोकळे रान मोकळे झाल्याने या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. मिठागरांच्या जमिनी या नापिकी असल्याचे दाखवून त्या अत्यल्प किमतीत खरेदी करून त्या अधिक किमतीने बड्या धनिकांना विकण्याचा उद्योगच गेल्या काही वर्षांत किनारपट्टीत सुरू झाल्याने प्राचीन मीठ उत्पादनाचा हा पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे नामशेष होताना दिसून येत आहे. दरम्यान, सध्या मिठागरांच्या जागेचा मालकी हक्क कोणाचा याबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मालकी हक्काचा हा प्रश्न सुटण्याची प्रतीक्षा येथील मीठ उत्पादक करीत आहेत.

उरण, पेण, अलिबाग तालुक्यात खाडी किनार्‍यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात मीठ उत्पादन होत होते. येथील काळ्या मातीप्रमाणे या मिठालाही थोडासा काळपट रंग असे. त्याच्या विशिष्ट चवीमुळे या मिठाला मागणी होती. देशभरातील व्यापारी येथे येऊन मीठ विकत घेऊन जात असत. यामुळेच पेण हे मिठाच्या व्यापाराचे मोठे केंद्र होते. या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे मीठ निरीक्षक कार्यालय पेणमधील वाशी फाटा येथे होते. व्यापार कमी झाल्याने या कार्यालयाचाही कारभार कमी झाला आहे.

सिंधुदुर्गात पूर्वी मालवण, मिठबाव येथे मिठाचे उत्पादन व्हायचे. आता केवळ शिरोड्यातच मीठ बनविले जाते. फेब्रुवारीच्या मध्यापासून हंगाम सुरू होऊन मे अखेरपर्यंत चालतो. वर्षाकाठी अडीच हजार टन मीठ उत्पादन होते. मीरा-भाईंदर हे खाडी किनारी वसलेले आहे. या परिसरात अनेक दशकांपासून मिठागरे होती. वाढत्या शहरीकरणामुळे केवळ 10 टक्केच मिठागरे शिल्लक आहेत.

औद्योगिकीकरणाचा फटका मिठागरांना

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील मीठ उत्पादनाला औद्योगिकीकरणाचा फटका बसत आहे. प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे दूषित रासायनिक पाणी वसईतील खाडीत आल्याने मासेमारीवर वाईट परिणाम होत आहे, तर अनेक भागांत मासेमारी बंद झाली असतानाच मीठ उत्पादन करणारी मिठागरेदेखील दूषित होऊ लागल्याने या भागातील अनेक मिठागरे आता बंद होण्याच्या स्थितीत आहेत. रंग व गंधावरून मीठ प्रदूषित झाल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.

एका मिठागरावर 20 कुटुंबांचा चरितार्थ

पूर्वी माशांची साठवणूक करण्यासाठी शीतगृहे नव्हती. त्यामुळे मासे पकडल्यावर ताज्या माशांच्या विक्रीअंती शिल्लक मासे वाळवण्यात येत असत. मासे वाळवण्याकरिता मीठ लावले जाते. मीठ हे जंतूनाशक गुणधर्माचे आहे. मासे वाळवण्यासाठी मीठ सहज उपलब्ध व्हावे यासाठी मिठागरांचा व्यवसाय खाडी व समुद्रकिनारी सुरू झाला. एका मिठागराच्या माध्यमातून किमान 20 कुटुंबांचा चरितार्थ चालत असे आणि कोकणातील पाच जिल्ह्यात पन्नास हजारांपेक्षा अधिक मिठागरे होती.

 

 

मिठागरांचे क्षेत्र कमी झालेले आहे. यास अनेक घटक कारणीभूत आहेत. पेणमधील मीठ उत्पादक पट्ट्यातील 23 पैकी फक्त 7 मीठ उत्पादक पट्टे आजच्या घडीला सुरू आहेत. मालकी हक्काबाबत येथील मीठ उत्पादकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.
– पीयूष कुमार, मीठ निरीक्षक, पेण

 

 

 

Back to top button