रस्ता रुंदीकरणासाठी झाडांचा बळी; कोर्‍हाळे ते वडगाव निंबाळकरचा प्रकार | पुढारी

रस्ता रुंदीकरणासाठी झाडांचा बळी; कोर्‍हाळे ते वडगाव निंबाळकरचा प्रकार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : निरा-बारामती या राज्य मार्गावरील कोर्‍हाळे ते वडगाव निंबाळकर (ढोले वस्ती) या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली; मात्र यामुळे या भागातील पुरातन झाडे नष्ट करण्यात येत आहेत. नुकतीच झाडे पाडण्यास सुरुवात झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निरा-बारामती मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली हजारो झाडे हीच या मार्गाची ओळख होती. आत्तापर्यंत रुंदीकरणामुळे वारंवार शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पुन्हा नव्याने झाडे लावण्याचा केविलवाना प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे.

कोर्‍हाळे बुद्रुक, पेशवे वस्ती, ढोले वस्ती या भागात रस्ता दोन्हीही बाजूला सुमारे सात फूट वाढणार आहे. वाहतूक सुरळीत होण्यास या रस्ता रुंदीकरणामुळे मदत होणार असली तरी शेकडो वर्षांची पर्यावरणपूरक झाडांची मात्र डोळ्यादेखत कत्तल होत आहे. सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झाडांमुळेच हे रुंदीकरण रखडले होते. या अगोदर ढोले वस्ती ते वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे या दरम्यान रस्ता रुंदीकरणांमध्ये शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली होती. सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याची उसाची वाहने याच मार्गाने ऊस वाहतूक करतात. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत आणि अपघात कमी होण्यास मदत होणार असली तरीही शेकडो झाडांचा बळी या रुंदीकरणात जाणार आहे. वड, पिंपळ, लिंब, जांभूळ अशी पर्यावरणपूरक झाडांचा यामध्ये र्‍हास होणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा

Back to top button