वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेतसह सिंहगड भागातील जंगलात वणव्यांचे सत्र थांबायचे नाव घेईना. पानशेत धरण खोर्यातील शिरकोली (ता. वेल्हे) येथील जंगलात सोमवारी (दि. 11) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वणवा लागला. त्यानंतर वणव्याने उग्र रूप धारण केले. त्यात शिरकोली, वरघड आंबेगाव खुर्द, घिवशी येथील खासगी व सरकारी जंगल, वनराई वनस्पतींसह गवत, जनावरांचा चारा जळून खाक झाला. तसेच अनेक पक्षी, प्राणीही वणव्यात मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, वणव्यात झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यात येत असल्याची माहिती पानशेतच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे यांनी दिली.
शिरकोली येथील पाच हजार झाडे वणव्यात जळून खाक झाली. तसेच विनायक कांबळे, माऊली पासलकर, नामदेव पडवळ आदी शेतकर्यांचा पेंढा, गवत आदी जनावरांचा चारा तसेच पंढरीनाथ पासलकर व इतर शेतकर्यांची आंब्याची झाडे भस्मसात झाली. वणव्यात लाखोंची वनसंपदा नष्ट झाली आहे. जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावात शिरत आहेत, असे शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ यांनी सांगितले. सिंहगडच्या अतकरवाडी येथील जंगलाला लागलेला भीषण वणवा. इन्सेट : पानशेत धरण खोर्यातील शिरकोली (ता. वेल्हे) येथे सोमवारी (दि. 11) लागलेल्या भीषण वणव्यात भस्मसात झालेला चारा.
जंगलाला चोहोबाजूंनी वणव्यांनी वेढल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन बिबटे जीव वाचवण्यासाठी शिरकोली गावात शिरले. यातील एक बिबट्याअनिकेत पासलकर यांच्या घरात शिरला. त्यावेळी अनिकेत याने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत घराबाहेर धाव घेतली. नंतर बिबट्यानेही धरणाच्या दिशेने धूम ठोकली, तर दुसरा बिबट्या गावाजवळ ढेबे वस्तीत दत्ता ढेबे यांच्या घराच्या पाठीमागे लपून बसला होता. गावकर्यांनी त्याला पिटाळून लावले.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मणेरवाडीजवळील जंगलात भीषण वणवा लागला. पुणे -पानशेत रस्त्याच्या गटारात पडलेला कचरा पेटविल्याने मणेरवाडी व परिसरातील जंगलात वणवा लागला.
– समाधान पाटील, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड
हेही वाचा