कंटेनरचे सील तोडून करायचा फ्रिज चोरी; आता पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

कंटेनरचे सील तोडून करायचा फ्रिज चोरी; आता पोलिसांच्या ताब्यात

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव एमआयडीसी हद्दीत कंटेनरचे सील तोडून त्यातील 10 फ्रिजची चोरी करणार्‍या कंटेनरचालकास रांजणगाव पोलिसांनी अटक केली. अहमदनगर येथे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. बाळू राजेंद्र थोरे (रा. तिंतरवानी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी दीपक खैरे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसीतील व्हर्लफुल कंपनीमध्ये कंटेनर (एन. एल. 01 एन. 7934) मधून 90 फ्रिज घेऊन केरळमधील मल्लपूरमकडे चालक बाळू थोरे जात होता.

वाटेत त्याने कंटेनरचे सील तोडून त्यातील 11 फ्रिज काढून विक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत थोरेचा शोध घेतला. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारावर त्याला अहमदनगर येथून अटक केली. त्याने कर्नाटकमधील एका हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवलेले एकूण 1 लाख 47 हजार रुपये किंमतीचे 10 फ्रिज जप्त केले. तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वैजनाथ नागरगोजे, तेजस रासकर, विजय शिंदे, माणिक काळकुटे आदींच्या पथकाने केला.

हेही वाचा

Back to top button