मैत्रिणीसोबत बोलल्याने फिल्मी स्टाईल अपहरण; १० लाखांची खंडणी मागणारे तिघेजण जेरबंद | पुढारी

मैत्रिणीसोबत बोलल्याने फिल्मी स्टाईल अपहरण; १० लाखांची खंडणी मागणारे तिघेजण जेरबंद

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : डिग्रस कऱ्हाळे येथे मैत्रिणीसोबत बोलण्याच्या कारणावरून तरुणाचे अपहरण करुन दहा लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली. यातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सोमवारी (दि. ११)  पहाटे पाठलाग केशवमाळ येथे पकडले.

डिग्रस कऱ्हाळे येथील प्रमोद पांडे यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात एक तक्रार दिली. या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ विनोद शेषराव पांडे (वय ३५) यांचे अज्ञातांनी अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागत असल्याची तक्रार दाखल केली. सदर रक्कम न दिल्यास विनोद यांना जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमुद केले. या तक्रारीवरून पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू, विजय रामोड, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांचे पथक स्थापन केले.

शेतकऱ्यांच्या वेशभुषा घेऊन गेलेल्या पोलिसांच्या जाळ्यात सापडले आरोपी

पोलीस पथकाने तक्रारीनंतर तपासाला सुरुवात केली. अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या वेषात तक्रारीतील नमूद केलेल्या आरोपींनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. दरम्यान आरोपींना या वेशभुषेत पोलीस असल्याची कोणतीही माहीती मिळू नये याची संपूर्ण काळजी पोलिसांनी घेतली. घटनास्थळी पोहोचून आरोपींना शेतकऱ्यांच्या वेशभुषेतील पोलीस पथकाने संपर्क साधल्यानंतर पैसे देण्यासाठीचे ठिकाण पुन्हा बदलले. लोहगाव शिवारात त्यांना बोलावण्यात आले. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तीन गावांच्या सिमेवर असलेल्या केशवमाळ येथे पैशाची बॅग ठेऊन जाण्यास सांगितले.

त्यानुसार या पथकाने केशवमाळ गाठून त्या ठिकाणी डमी पैशाची बॅग ठेवली व आरोपींना माहिती दिली. काही वेळातच ओमकार उर्फ शुटर मुखमहाले तेथे आला व त्याने बॅग उचलताच बाजूलाच शेतकऱ्यांच्या वेषात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.ओमकारने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने विनोद पांडे हे हनुमान उर्फ हंटर विश्‍वनाथ कऱ्हाळे, नितीन उर्फ जादू रामेश्‍वर कऱ्हाळे (दोघे रा. डिग्रस कऱ्हाळे) याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा केशव माळाच्या परिसरात शोध मोहिम सुरु केली.

हनुमान उर्फ हंटर व नितीन उर्फ जादू यांनी देखील साथीदार पकडल्याचे समजल्यानंतर पळ काढला. पोलिसांनी पाच किलोमिटर पाठलाग करून त्यांना पकडले. यातून विनोद पांडे यांची सुखरुप सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी ओमकार, हनुमान व नितीन या तिघांचीही अधिक चौकशी केली असता त्यांनी हनुमान याच्या मैत्रिणीला विनोद पांडे बोलत असल्याच्या कारणावरून त्याचे अपहरण करून खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे.

Back to top button