Coastal Road : वरळी ते मरीन ड्राईव्ह आता नऊ मिनिटांत! | पुढारी

Coastal Road : वरळी ते मरीन ड्राईव्ह आता नऊ मिनिटांत!

मुंबई : राजेश सावंत : छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडची एक चार पदरी लेन सोमवारपासून सुरू झाल्याने वरळी ते मरीन ड्राईव्ह हे सुमारे 9 किमीचे अंतर अवघ्या 9 मिनिटात कापले जात आहे. वाहतूक कोंडीतून सुटका, वेळेची बचत आणि इंधनाचीही बचत असा मुंबईकरांचा तिहेरी फायदा करणार्‍या या कोस्टल रोडवरून प्रवास करण्याचा पहिला अनुभव पुढारी प्रतिनिधीने सोमवारी घेतला. ( Coastal Road )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांनी सकाळी 11:30 वाजता हिरवा झेंडा दाखवला आणि कोस्टल रोड खुला होण्याची वाट बघत रांगेत उभी असलेली मुंबईकरांची वाहने या नव्या किनारी मार्गावरून प्रस्थान करती झाली.

कोस्टलवरून जाण्याचा पहिला मान बेस्टच्या डबल डेकर व सिंगल डेकर बससह सकाळपासून हा रोड खुला होण्याची वाट पाहणार्‍या विविध प्रकारच्या व्हिन्टाज गाड्यांना देण्यात आला.

अनेक गाड्या रंगीबेरंगी फुले लावून सजवण्यात आल्या होत्या. बसमधून कोळी महिलांसह अन्य महिला व विविध बचत गटाच्या महिलांनी प्रवास केला. पहिला प्रवास करणार्‍या प्रवाशांसह पाहुण्यांचे विविध प्रकारची वाद्य वाजवून स्वागत करण्यात आले. सकाळी सुमारे साडेअकरा वाजता सुरू झालेला हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात संपला देखील!

प्रियदर्शनी पार्क येथून सुरू होणार्‍या बोगद्यामध्ये प्रवेश केल्यानंतर मरीन ड्राईव्ह कधी आले हे समजले देखील नाही. आतापर्यंत डोंगर पोखरून काढलेल्या बोगद्याचा प्रवास अनुभवला आहे. मुंबईत भुयारी मेट्रो उभारली जात असली तरी तो प्रवास अद्याप अनुभवलेला नाही. कोस्टल रोडच्या निमित्ताने समुद्राखालून जाणारा बोगदा आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो.

या बोगद्यात प्रवेश केल्यानंतर बसमधील महिलांसह विंटेज कारमधील प्रवाशांनी एकच जल्लोष करून या प्रकल्पाला दाद दिली.समुद्राच्या पोटात शिरलो आणि हा सुमारे दोन किमी लांबीचा हा बोगदा अवघ्या दोन मिनिटात पार झाला देखील. ( Coastal Road )

तीन महिन्यात काम पूर्ण होणार !

कोस्टल रोड वरळी ते वांद्रे राजीव गांधी सी लिंकला जोडण्यासह उत्तर वाहिनी मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू असून हे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा रस्ता दोन्ही दिशेने खुला होईल.

रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

कोस्टल रोडला वीर सावरकरांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांची नाव देण्याची मागणी होत होती. मात्र या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज नामकरण केलेला मुंबईतील हा पहिलाच मोठा रस्ता आहे.

टोल मुक्त प्रवास !

या रस्त्याच्या कामासाठी महानगरपालिकेने जवळपास 14 हजार कोटी रुपये खर्च केलेले असूनही कोस्टलवरून प्रवास करण्यासाठी कोणताही टोल आकारण्यात आलेला नाही. प्रत्येक मुंबईकराला या रस्त्यावरून जाण्याचा मोफत आनंद लुटता येणार आहे.

70 टक्के वेळेची बचत

कोस्टल रोडमुळे अंदाजे 70 टक्के वेळेची बचत, तर 34 टक्के इंधन बचत होणार आहे. अंदाजे 70 हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होऊन, मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे.

Back to top button