कोल्हापूर : सीपीआरला बदनाम करू नका : पालकमंत्री हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरला बदनाम करू नका : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सीपीआरमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये. रुग्णसेवा केंद्रबिंदू मानून काम करावे. सीपीआर बदनाम होणार नाही, विद्यार्थी, रुग्णांचा भ्रमनिरास होता कामा नये याची दक्षता घ्या, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ सीपीआरमधील अधिकार्‍यांना दिल्या. दाऊदी बोहरा समाजाकडून सीपीआरला 6 लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य सोमवारी प्रदान करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामास सुरुवात होईल. रुग्ण वाढल्याने सीपीआरमध्ये उपचाराला मर्यादा येऊ लागल्याने शेंडापार्कात वैद्यकीय विस्तार सुरू केला आहे. लवकरच येथील बांधकामे पूर्णत्वास येतील.

दाऊदी बोहरी समाजाचे अध्यक्ष अलीअसगर चन्नीवाल म्हणाले, गोरगरिबांचा सीपीआर आधारवड आहे. समाजातील सर्वच रुग्ण येथे उपचार घेतात. येथे वैद्यकीय साहित्यांची टंचाई असल्याचे कळाल्यानंतर आम्ही समाजातर्फे वैद्यकीय साहित्य देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे,ष्जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीश कांबळे, डॉ. अजित लोकरे, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. सुदेश गंधम, डॉ. अनिता परितेकर, डॉ. पवन खोत, डॉ. राहुल बडे, प्रसाद संकपाळ, पोलिस निरीक्षक दिलीप पोवार उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक
डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी आभार मानले.

शेंडा पार्क वैद्यकीय नगरी म्हणून ओळखली जाणार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार शेंडापार्क येथे सुरू आहे. तेथे इमारती उभारणीसाठी सुमारे 1 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रियेचे काम गतीने सुरू असून त्यासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी लागेल, असे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेंडापार्क ही वैद्यकीय नगरी म्हणून ओळखली जाणार आहे.

Back to top button