सुप्रिया सुळे अजूनही बचावात्मक पवित्र्यातच : कार्यकर्ते पडले बुचकळ्यात | पुढारी

सुप्रिया सुळे अजूनही बचावात्मक पवित्र्यातच : कार्यकर्ते पडले बुचकळ्यात

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बारामतीचे रणांगण कमालीचे तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट अतिआक्रमक झालेला असतानाच खासदार सुप्रिया सुळे या बचावात्मक पवित्र्यात आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. बारामतीत आता ’नणंद-भावजय’ असा सामना होणार हे निश्चित झाले असतानाही खासदार सुळे यांची बचावात्मक भूमिका कार्यकर्त्यांनाही बुचकळ्यात पाडणारी ठरत आहे. बारामतीतील बहुतांश सहकारी संस्थांवर अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अजूनही चाचपडतो आहे.

पक्ष व चिन्ह गेल्यानंतर आता त्यांनी नव्याने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यातून काही नव्या-जुन्यांना सोबत घेऊन पक्षाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु बारामतीच्या होमपीचवर म्हणावे तसे काम त्यांच्याकडून अजून सुरू झालेले नाही. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार, जय पवार यांच्याकडून दौरे आखले जात आहेत. मोठे मेळावे घेतले जात आहेत. खासदार सुळे यांनीही शहर व तालुक्यात एक-दोन ठिकाणी मेळावे घेत मोर्चेबांधणीला सुरुवात केली. परंतु अजित पवार गटाच्या तुलनेत त्या अजून बर्‍याच मागे आहेत. युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला दिलेली भेट वगळता पवार कुटुंबातील अन्य कोणीही अद्याप त्यांच्या बाजूने ताकदीने उतरलेले नाही.

पक्ष व चिन्ह मिळविण्याच्या आधीपासूनच अजित पवार बारामतीच्या मैदानात आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट शरद पवार, सुप्रिया सुळे यांना ’टार्गेट’ केले आहे. भाजपासोबत जाण्याचा निर्णय एकमताने झाला, परंतु वरिष्ठांनी त्यात सातत्याने चालढकल केली, त्यांना मुलीला अध्यक्ष करायचे होते, त्यांच्यासाठी आजवर मी खूप काही केले. पण आता पक्ष चोरला म्हणून माझी बदनामी सुरू आहे, या
शब्दांत अजित पवार यांनी शरसंधान साधले होते.

बारामतीला अनेकदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, पण मोठी कामे झाली नाहीत, काही लोक ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगत भावनिक करतील अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. नुसते सेल्फी काढून किंवा संसदेत भाषणे करून कामे होत नसतात, खासदार आता टपरीवर चहा पिवू लागल्या आहेत, त्यांना 17 वर्षांत आत्ताच हे कसे सुचले या शब्दांत सुप्रिया सुळे यांच्यावर प्रहार केला होता.

एकीकडे अजित पवार व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले असताना सुप्रिया सुळे यांच्या गोलमाल भाषणांमुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. थेट टीका करणे त्या टाळत आहेत. शिवाय माझी लढाई वैयक्तिक नसून वैचारिक आहे, या भाषेपलीकडे त्या अद्याप जायला तयार नाहीत. शरद पवार हे देखील ज्याने पक्ष काढला त्याचा पक्ष दुसर्‍याला दिला, चिन्हाने फारसा फरक पडत नाही, भावनिक राजकारण आमच्याकडून करण्याचा प्रश्नच येत नाही, या पलीकडे गेलेले नाहीत. आता थेट रणांगणातील लढाई सुरू झाली आहे. तरीही पुरेशी आक्रमकता या गटाकडून घेतली जात नाही, त्याबद्दल कार्यकर्ते आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा

Back to top button