बड्यांकडे 5 हजार कोटींची थकबाकी; महापालिके कडून व्हावी वसुलीची कारवाई | पुढारी

बड्यांकडे 5 हजार कोटींची थकबाकी; महापालिके कडून व्हावी वसुलीची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 1746 बड्या मालमत्ताधारकांकडे महापालिकेची 5182 कोटी रुपयांची मिळकत कराची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सर्वंकष प्रयत्न करावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. शहरात 1 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असणारे फक्त 1746 थकबाकीदार असून, त्यांच्याकडे 5182 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसून येत आहे. यापैकी 94 प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यात अडकलेली रक्कम 988 कोटी रुपये आहे. यातील फक्त दोन प्रकरणांत महापालिकेची 565 कोटी रुपयांची थकबाकी अडकली आहे. मोबाईल टॉवरची 1061 प्रकरणे असून त्यात 2427 कोटी रुपये थकीत आहेत. ही प्रकरणे अनेक वर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत.

ही प्रकरणे गेली अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबीत राहणे हे विधी विभागाचे संपूर्ण अपयश आहे. त्यामुळे महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून ही सर्व प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. यातील किमान निम्म्या प्रकरणांचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला तरी महापालिकेला 1800 कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल.
थकबाकीदारांच्या यादीत 184 प्रकरणे दुबार कर आकारणीची असून यामध्ये अडकलेली रक्कम 576 कोटी रुपये आहे. त्यामुळे शहानिशा करून ही प्रकरणे थकबाकीदाराच्या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे. या यादीत 193 प्रकरणे वादातील दाखवण्यात आले असून यात अडकलेली रक्कम 561 कोटी रुपये आहे. ही प्ररकरणे तातडीने सोडवून पैसे वसूल करणे गरजेचे आहे.

संरक्षण खात्याकडे 79 कोटी रुपये तर महावितरणकडे 56 कोटी रुपये थकबाकी आहे. पाटबंधारे खात्याची थकबाकी 73 कोटी रुपयांची असून त्याची वसुली महापालिका पाटबंधारे विभागाला देत असलेल्या पाणीपट्टीमधून करावी, अशीही मागणी वेलणकर यांनी केली आहे. अनेक थकबाकीदारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित नसल्याचे दिसते. अशा थकबाकीदारांकडून तत्काळ वसुलीचे प्रयत्न होण्याची गरज आहे. काही शे रुपयांची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवण्यात महापालिकेने आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा या बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button