IPL 2024 LSG New Captain : लखनौ सुपर जायंट्सने केली कर्णधार-उपकर्णधाराची घोषणा | पुढारी

IPL 2024 LSG New Captain : लखनौ सुपर जायंट्सने केली कर्णधार-उपकर्णधाराची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 LSG New Captain : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17वा हंगाम काही आठवड्यांत सुरू होणार आहे. बीसीसीआयने लीगच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील शानदार सामन्याने होणार आहे. सर्व संघ आगामी आयपीएल हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, आता लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने आपल्या कर्णधार आणि उपकर्णधाराची घोषणा केली आहे.

निकोलस पुरन एलएसजीचा नवा उपकर्णधार

लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी (29 फेब्रुवारी) त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावरून एक पोस्ट शेअर करून संघाचा कर्णधार आणि उपकर्णधाराची घोषणा केली. त्यांनी केएल राहुल आणि निकोलस पुरन यांचा फोटो शेअर केला आहे. दोघांनी धरलेल्या टी-शर्टवर निकोलस पुरनचे टोपणनाव निक्की पी असे लिहिलेले आहे. त्या खाली व्हिसी असे लिहिले आहे. त्याच वेळी, कॅप्शनमध्ये एलएसजीने स्पष्टपणे लिहिले आहे की, केएल राहुल हा कर्णधार आणि त्याचा उपकर्णधार निकोलस पुरन असेल. गेल्या हंगामादरम्यान एलएसजीचा उपकर्णधार क्रुणाल पंड्या होता, त्याने केएल राहुलच्या दुखापतीनंतर संघाने नेतृत्व केले होते. (IPL 2024 LSG New Captain)

लखनऊ सुपर जायंट्स संघाने 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये प्रवेश केला. या संघाने आतापर्यंत दोन हंगाम खेळले आहेत. दोन्ही स्पर्धेत संघ तिसरा क्रमांकावर राहिला आणि प्लेऑफसाठी पात्र ठरला. संघ एलिमिनेटर खेळला. मात्र, दोन्ही वेळा एलिमिनेटर सामन्यात एलएसजी संघाचा पराभव झाला. 2022 च्या मोसमात, एलएसजीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केले होते, तर 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत हा हंगाम एलएसजीसाठी खास असेल, कारण केएल राहुल संपूर्ण हंगाम खेळणार आहे. (IPL 2024 LSG New Captain)

पंड्या ऐवजी निकोल उपकर्णधार का?

फ्रँचायझीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेकांनी क्रुणाल पंड्याचे उपकर्णधारपद का काढून घेतले, अशी विचारणा केली आहे. गेल्या मोसमात कर्णधार म्हणून तसेच एक अष्टपैलू म्हणून पंड्याने चांगली कामगिरी केली नसल्याने त्याला डच्चू दिल्याची चर्चा रंगली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ प्लेऑफमध्ये जरी पोहोचला असला तरी तो फार पुढे जाऊ शकला नाही. मात्र सोशल मीडियावर अनेकांनी क्रुणाल पंड्याची बाजू घेत राहुलच्या गैरहजेरीत त्याने एलएसजी संघाला अधिक चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे मत मांडले आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा संघ

केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, काइल मेयर्स, देवदत्त पडिककल, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, क्रुणाल पंड्या, युद्धवीर सिंग, यश ठाकूर , प्रेरक मांकड, अमित मिश्रा, मयंक यादव, शामर जोसेफ, मोहसीन खान, कृष्णप्पा गौतम, अर्शीन कुलकर्णी, शिवम मावी, एम सिद्धार्थ, डेव्हिड विली, ॲश्टन टर्नर, मोहम्मद अर्शद खान.

Back to top button