लॉक तोडून आत शिरला अन् गाडीतच झोपला! | पुढारी

लॉक तोडून आत शिरला अन् गाडीतच झोपला!

फरिदाबाद : चोरी करायला आलेला चोर हा चोरी करून शक्य तितक्या लवकर तेथून पोबारा करतो, हे साहजिकच आहे. पण, हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे एक चोर रात्री कार चोरण्यासाठी आला. पण, दारूच्या नशेत कारमध्येच झोपला आणि त्यानंतर जे होणार ते साहजिकच होते. चोर कारमध्ये झोपल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि चोराला ताब्यात घेण्यात आले.

फरिदाबादमध्ये पोलिस चौकी क्रमांक तीनच्या हद्दीमध्ये हा विचित्र प्रकार घडला. पार्किंग करण्यात आलेली इको व्हॅन चोरण्यासाठी चोरटा आला होता. तो गाडीच्या दरवाज्याचं लॉक तोडून गाडीमध्ये शिरला, त्याने गाडीचं गिअर लॉकही तोडले. मात्र, दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला गाडीमध्येच झोप लागली. सकाळी गाडीचा मालक गाडी स्वच्छ करण्यासाठी आला, तेव्हा त्याला त्याच्या गाडीमध्ये एक तरुण झोपलेला दिसला. तसेच गाडीच्या दरवाज्याचे लॉक तोडले असल्याचेही त्याला आढळून आले. त्यामुळे गाडीमध्ये झोपलेला तरुण हा चोर आहे, याचा अंदाज आला.

त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. झोपेचा असा फटका बसल्याने त्या चोरासमोर पश्चात्तापाशिवाय काहीच पर्याय बाकी राहिला नव्हता. पोलिसांनी चोरट्याकडून अमली पदार्थही जप्त केले. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली विविध प्रकारची हत्यारे देखील पोलिसांनी जप्त केली.

Back to top button