परभणी : गंगाखेडमध्ये बारावी परीक्षा पर्यवेक्षणास दांडी मारणे ९६ शिक्षकांना भोवणार | पुढारी

परभणी : गंगाखेडमध्ये बारावी परीक्षा पर्यवेक्षणास दांडी मारणे ९६ शिक्षकांना भोवणार

परभणी, पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परिक्षेसाठी गंगाखेड तालुक्यातील विविध परिक्षा केंदांवर काही शिक्षकांना पर्यवेक्षणाचे काम देण्यात आले होते. आज (दि.२१) बारावीचा पहिला पेपर होता. पहिल्याच पेपरवेळी ९६ शिक्षक परीक्षा केंदावर गैरहजर राहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान गंगाखेड गटशिक्षणाधिकार्‍यांनी याची दखल घेत तातडीने या ९६ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून येत्या २४ तासात गैरहजेरीबाबतचा स्पष्ट खुलासा द्यावा, असे निर्देश दिले आहेत.

जिल्हा कॉपीमुक्‍त व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने यावेळी कठोर पावले उचलत पर्यवेक्षणासाठी शिक्षकांच्या अदलाबदलीचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भरारी व बैठया पथकांची नियुक्‍ती मोठया प्रमाणावर केली आहे. या परिक्षेसाठी पुरेसे मणुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी शिक्षकांना विविध केंद्रांवर नियुक्त्या देवून पर्यवेक्षणाचे काम दिले आहे. मात्र इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला गंगाखेड तालुक्यातील अनेक केंद्रांवरून तब्बल ९६ शिक्षक गैरहजर राहिले आहेत. शिक्षकांच्या या गैरहजेरीचा परिणाम परीक्षा केंद्रांवर झाला. यामुळे हजर राहिलेल्या शिक्षकांचा ताण वाढला. याची दखल गंगाखेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी तत्परतेने घेतली असून या सर्व ९६ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍ती करण्यात आलेली असताना परिक्षेच्या वेळी केंद्रावर अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने शासकीय कामात दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याअनुषंगाने कारणे दाखवा नोटीसीद्वारे संबधित शिक्षकांनी आपला स्पष्ट खुलासा चोवीस तासाच्या आत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावा तसेच आपणास नेमून दिलेल्या केंद्रावर तात्काळ उपस्थित राहावे, असे नोटिसीत म्हटले आहे. खुलासा विहित वेळेत सादर न केल्यास अथवा समाधानकारक न वाटल्यास प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना गैरहजर शिक्षकांची यादी व त्यांना दिलेली परिक्षा केंद्रे यांचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

 

    हेही वाचा :

Back to top button