धुळ्यात रंगणार पाच दिवसीय ‘महासंस्कृती महोत्सव’, काय काय असणार? | पुढारी

धुळ्यात रंगणार पाच दिवसीय ‘महासंस्कृती महोत्सव’, काय काय असणार?

धुळे : पुढारी वृत्तसेवा- स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च, 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महासंस्कृती महोत्सवनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेसह विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्ममाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करुन विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्याची माहिती जनसामान्यापर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने धुळे येथे सोमवार दि. 26 फेब्रुवारी ते शुक्रवार, दि. 1 मार्च, 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान, धुळे येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

या पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवात विविध कला प्रकाराची व कार्यक्रमांची निश्चिती करण्यात आली असून या महोत्सवासाठी कलाकार व कलाप्रकार यांच्या निवडीबाबत स्थानिक कलावंतांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यात दिंडी काढण्यात येणार असून त्यात ढोलताशा पथक, लेझिम पथक, कलशधारी मुली, कानुबाई देखावा, आदिवासी संस्कृती दर्शन, टिपरी नृत्य, वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदिवासी नृत्य, शिवकालीन शस्त्र कलेचे सादरीकरण, शहनाई तबला जुगलबंदी, शाहिरी शिवगर्जना, महाराष्ट्राची हास्यजत्रा नाट्य, गीतगायन, वहीगायन, खान्देशी लोककला आणि आहिराणी लोकगीत, मराठी अहिराणी गीतगायन व नृत्य, भरतनाट्यम, व्यक्तीगत एकपात्री नाटक, काव्यमय संगीत कार्यक्रम, गोंधळ, पोतराज, पोवाडा, वहीगायन, हिंगरी व जात्यावरची गाणी, मारुतीची जत्रा बालनाट्य, शाहीरी जलसा, हिंदी मराठी गाण्याची संगीतमय मैफिल, आपली मायबोली, खान्देशी अहिराणी गीते, वारी- सोहळा संत परंपरा, पंढरीच्या वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदाय यावरील नृत्य नाटीका, मल्लखांब, जगणं तुमचं आमचं काव्यवाचन व गायन मैफिल, महाराष्ट्र दर्शन, अभंग, महाराष्ट्राची संत परंपरा, लावणी, अहिराणी नृत्य, मोगरा फुलला भक्तीमय संगीत कार्यक्रम, दिव्यांग विद्यार्थी कार्यक्रम, बाहुल्यांचे विश्व कटपुतली कार्यक्रम, बेलसर स्वारी नाट्य, कविसंमेलन, अरे संसार संसार कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारीत संगीत व नाट्यमय कलाकृती, तसेच मराठी हिंदी गझलांची भावगर्भ मैफिल इत्यादी भरगच्च कार्यक्रम पाच दिवसासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

अशी असेल वेळ

तसेच महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, बचतगट उत्पादन, वस्त्र संस्कृती दालन, वन्यजीव व छायाचित्र प्रदर्शन, तसेच 40 बचतगट उत्पादनाचे दालनही राहणार आहे. हा सांस्कृतिक महोत्सव दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत राहणार आहे.

धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button