८४ टक्के भारतीय झोपेतून उठल्यावर लगेच पाहतात मोबाईल! | पुढारी

८४ टक्के भारतीय झोपेतून उठल्यावर लगेच पाहतात मोबाईल!

वॉशिंग्टन : मोबाईल फोन आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागच बनलेला आहे. मात्र, त्याचा अतिवापरही अनेक वेळा चिंतेचे कारण बनत असतो. आता बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 84 टक्के स्मार्टफोन वापरणारे झोपेतून उठल्यानंतर 15 मिनिटांत त्यांचे फोन तपासतात. या अहवालात असेही समोर आले आहे की, सुमारे 31 टक्के लोकांचा सकाळी उठल्यावरचा वेळ स्मार्टफोनवरच खर्च होतो आणि लोक दिवसातून सरासरी 80 वेळा त्यांचे स्मार्टफोन तपासतात!

‘रिइमेजिनिंग स्मार्टफोन एक्सपिरियन्स ः हाऊ सरफेस कॅन प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन द फोन’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, लोक त्यांचा 50 टक्के वेळ स्मार्टफोनवर स्ट्रीमिंगमध्ये घालवतात. 2010 मध्ये स्मार्टफोनवर घालवलेल्या वेळेचे प्रमाण सुमारे दोन तासांवरून 4.9 तासांपर्यंत वाढले आहे, असे अहवालात म्हटले आहे. 2010 मध्ये, फोनवर घालवलेला 100 टक्के वेळ मजकूर किंवा कॉलवर बोलण्यात होता, तर 2023 मध्ये ते प्रमाण फक्त 20-25 टक्के होते. सोशली अ‍ॅक्टिव्ह राहणार्‍याने दुसरे स्थान पटकावले आहे. त्यानंतर सर्चिंग, गेमिंग, शॉपिंग, ऑनलाईन व्यवहार आणि बातम्यांचा क्रमांक लागतो.

18-24 वयोगटातील लोक 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांपेक्षा इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्टस् इत्यादीसारख्या शॉर्ट फॉर्म व्हिडीओंवर जास्त वेळ घालवत असल्याचे आढळले. याचा अर्थ, आताची तरुण पिढी आपला सर्वाधिक वेळ हा मोबाईलवर घालवत आहे. अहवालात असेही समोर आले आहे की, दोनपैकी एक वेळा, लोक डिव्हाईसच्या गरजेपेक्षा जास्त सवयीमुळे त्यांचा फोन उचलतात. लोकांच्या जीवनात स्मार्टफोनचे महत्त्व वाढल्याचे अधोरेखित करून अहवालात असे म्हटले आहे की, घराची चावी किंवा वॉलेटपेक्षा मोबाईल अधिक महत्त्वाची झाली आहेत. भारतात बहुतेक लोकसंख्येसाठी इंटरनेटचा पहिला प्रवेश मोबाईल फोनद्वारे करतात.

आता लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर इंटरनेटचा वापर फार कमी होतो. इंटरनेटचे परवडणारे दर आणि स्वस्त डेटा यामुळे हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिजिटल वर्ल्ड आणि सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकाला मोबाईलची प्रचंड सवय लागली आहे. रिसर्चनुसार 50 टक्के लोकांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. एवढंच नव्हे, तर भारतीय युझर्स कोणत्याही कारणाशिवाय उगाच मोबाईल हातात घेतात. एवढंच नव्हे, तर गोल्बल मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप म्हणजे बीसीजीच्या माहितीनुसार, एक सामान्य स्मार्टफोन यूजर दिवसातून 70 ते 80 वेळा फोन उचलतात.

Back to top button