पीपीएफ खाते बंद पडले आहे का? सक्रिय करण्यासाठी जाणून घ्या प्रक्रिया | पुढारी

पीपीएफ खाते बंद पडले आहे का? सक्रिय करण्यासाठी जाणून घ्या प्रक्रिया

मेघना ठक्करे

सार्वजनिक निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंड फंड ही कर सवलत देणारी आणि दीर्घकाळासाठी बचत प्रदान करणारी सुविधा असून, ती गुंतवणुकीतील लोकप्रिय साधनांपैकी एक मानली जाते. अर्थात, काही वेळा निष्काळजीपणामुळे पीपीएफ खाते निष्क्रिय होते आणि बंद पडते. बंद पीपीएफ खाते पुन्हा सुरू करायचे असेल, त्याचे फायदे घ्यायचे असतील, दंडापासून वाचायचे असेल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यानुसार आपण पीपीएफ खाते पुन्हा सक्रिय करू शकता.

संबंधित बातम्या 

पीपीएफ खाते खरोखरच बंद पडले आहे का? याची अगोदर खातरजमा करा. यासाठी आपले खाते असणार्‍या बँकेत किंवा टपाल कार्यालयात जाणे गरजेचे आहे. पर्यायी रूपातून काही बँका पीपीएफची ऑनलाईन सेवादेखील देतात. यानुसार आपण घरबसल्या खात्याची स्थिती जाणून घेऊ शकता.

डिफॉल्टचे नियम जाणून घ्या

पीपीएफ खाते कशामुळे बंद पडले, हे अगोदर जाणून घ्या. बहुतांश वेळा किमान योगदान न दिल्याने खाते बंद झालेले असते. म्हणजेच पाचशे रुपयेदेखील वर्षभरात न भरल्याने खाते निष्क्रिय होते. खाते निष्क्रिय असेल, तर खातेधारकाला या काळात कर्ज किंवा थोडेफार पैसे काढण्याची मुभादेखील मिळत नाही.

कालावधी समजून घ्या

आपले पीपीएफ खाते कधीपासून बंद पडले आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. बंद पडलेले पीपीएफ खाते हे एका ठरावीक कालावधीनंतर पुन्हा सक्रिय केले जाते. निष्क्रिय झाल्यानतंर पुढील एक ते दोन आर्थिक वर्षांच्या आत सक्रिय करता येते.

पोस्ट किंवा बँकेत जावे

आपण ज्या शाखेत पीपीएफ खाते सुरू केले आहे, त्या बँकेत किंवा टपाल कार्यालयात जावे. सोबत पीपीएफ पासबुक, ओळखपत्र आणि रहिवासी पत्तादेखील बाळगावा.

रिअ‍ॅक्टिव्हेशनचा अर्ज भरा

पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून पीपीएफ खाते सक्रिय करण्याचा अर्ज घ्यावा आणि तो अचूक भरावा. नाव, पत्ता, पीपीएफ खाते क्रमांक आणि कालावधी नमूद करावा. सर्व विवरण योग्यरित्या भरावे.

योगदान गरजेचे

खाते सक्रिय करण्यासाठी किमान योगदान रक्कम भरावी. सध्याच्या नियमानुसार किमान योगदानाची रक्कम पाचशे रुपये वार्षिक आहे.

गरज भासल्यास दंड भरावा

निष्क्रियतेपोटी आकारलेला दंड भरणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात वार्षिक पन्नास रुपये दंड आहे.

पासबुक आणि कागदपत्रे अपडेट करा

रिअ‍ॅक्टिव्हेट प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपले पीपीएफ पासबुक अपडेट करून घ्यावे. याशिवाय पासबुकवरच्या माहितीची पडताळणी करा.

नियमित योगदान देत सक्रिय ठेवा

एकदा खाते सक्रिय झाल्यानतंर भविष्यात ते निष्क्रिय होणार नाही, यासाठी नियमित योगदान देण्याची सवय ठेवा. वेळोवेळी योगदान देण्याबाबत सजग राहा.

खात्याची नियमित तपासणी करा

आपल्या पीपीएफ खात्याची स्थिती आणि व्यवहारांवर नियमित रूपाने लक्ष ठेवा. या सवयीमुळे पीपीएफ खात्याशी सबंंधित नियम आणि धोरणात होणार्‍या बदलाचे तत्काळ आकलन होईल. त्या जोडीला आपले खाते सक्रिय आहे आणि चांगल्या स्थितीत असल्याचे समाधानही लाभेल.

Back to top button